पर्थ (ऑस्ट्रेलिया) : पत्नी, तीन मुली आणि सासूची हत्या केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियात 24 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपी अँथनी हार्वेने राहत्या घरी सुरीने भोसकून कुटुंबातील पाच जणांची हत्या केली.


अँथनीने आपल्या दोन वर्षांच्या जुळ्या मुली अॅलिस आणि बीट्रीक्स आणि तीन वर्षांची मुलगी शार्लेट यांच्यासह 41 वर्षीय पत्नी मारा क्वीन हिची हत्या केली. ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. चौघींची हत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी 73 वर्षीय सासू बेवर्ली क्वीन यांचाही अँथनीने जीव घेतल्याचा आरोप आहे.

मयत मारा क्वीनच्या फेसबुक प्रोफाईलनुसार दोघांनी चार वर्षांपूर्वी एंगेजमेंट केली होती. हृदय हेलावून टाकणाऱ्या या सामूहिक हत्याकांडासाठी आरोपीने सुरीसह काही धारदार शस्त्रांचा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

हत्या केल्याच्या आठवड्याभरानंतर आरोपी अँथनीनेच पोलिस स्टेशनला जाऊन याबाबत कबुली दिली. म्हणजेच काही दिवस तो त्याच घरात मृतदेहांसोबत राहिल्याचा अंदाज आहे.