नवी दिल्ली : भारताने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. भारताकडून या हल्ल्याबाबत अद्याप याला दुजोरा मिळाला नसला तरी भारताच्या हल्ल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




 भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल
या हल्ल्याने भारताने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. भारताच्या 10 मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर 1 हजार किलोचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे. यासंबधीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. प्रामुख्याने पाकिस्तानी युजर्सकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.



14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती.

आज भारताने नियंत्रण रेषा ओलांडली. भारतीय हवाई दलाने जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानमधील बालाकोट भागात एअर स्ट्राईक केला. 1 हजार किलोंचे बॉम्ब फेकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात जैशची कंट्रोल रुम जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान पाकिस्तानी सेनेने भारतावर उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली असल्याचा दावा पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवरुन केला आहे.