नई दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला वेगवेगळ्या पातळ्यांवर अडचणीत आणले आहे. यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी भारत पाकिस्तानला संपवून टाकू शकतो अशी भीती वक्त केले आहे. जर पाकिस्तानने भारतावर एकही न्यूक्लियर बॉम्ब टाकेल तर भारत पाकिस्तानवर 20 न्यूक्लियर बॉम्बने हल्ला करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.



‘डॉन’ या पाकिस्तानी वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे. भारत-पाकिस्तान संबंध धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहेत. दोन्ही देश अण्वस्त्रांचा वापर करणार नाहीत असेही मुशर्रफ म्हणाले आहेत. आपण भारताविरोधात अण्वस्त्र वापरले तर भारत 20 अणूबॉम्ब टाकून पाकिस्तानला संपवेल असे मुशर्रफ म्हणाले. ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानने भारतावर पहिला हल्ला करावा हा एकमेव तोडगा आहे. पाकिस्तानने भारतावर 50 अणूबॉम्ब टाकले तरच भारत 20 अणूबॉम्ब वापरण्याच्या स्थितीमध्ये राहणार नाही. तुम्ही पहिला अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी तयार आहात का? असा सवाल मुशर्रफ यांनी विचारला.

मागच्या आठवडयात मुशर्रफ यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात कुठल्याही भावना नाहीत. त्यांच्यामध्ये कुठलीही आग नाही असा आरोप केला होता. पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थन करताना पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हा भारताचा आरोप देखील त्यांनी फेटाळून लावला होता.

मुशर्रफ यांनी  2016 मध्येच पाकिस्तान सोडला आहे. ते आता दुबईत राहतात. त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा खटला सुरु आहे. ते ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (एपीएमएल) चे प्रमुख आहेत.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी युद्धच आवश्यक : बाबा रामदेव | नवी दिल्ली | एबीपी माझा