Imran Khan Nomination Rejected : माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Former PM Imran Khan) पाकिस्तानमध्ये (Pakistan Election) 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत लढू शकणार नाहीत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान निवडणूक आयोगाने शनिवारी (30 डिसेंबर) ही माहिती दिली. इम्रान खान यांनी निवडणूक लढवण्यासाठी दोन मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
71 वर्षीय इम्रान खान एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून हटल्यानंतर राजकीय आणि कायदेशीर लढाईत अडकले आहेत. खान यांच्यावर पंतप्रधान असताना सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप आहे, ज्यासाठी त्यांना ऑगस्टमध्ये तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत.
अपात्र घोषित करूनही अर्ज दाखल केला
इम्रान खान यांच्या मीडिया टीमने सांगितले की, भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्याने खान यांना 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी देण्यास अपात्र घोषित करण्यात आले होते, परंतु तरीही त्यांनी शुक्रवारी (29 डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल केला.
इम्रान खान यांची दोन मतदारसंघातून उमेदवारी
लाहोरमधील नाकारलेल्या उमेदवारांच्या यादीत, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने म्हटले आहे की इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला. कारण ते मतदारसंघात नोंदणीकृत मतदार नव्हते आणि न्यायालयाने त्यांना दोषी आणि अपात्र घोषित केले आहे. इम्रान खान यांनी त्यांच्या जन्मगावी मियानवली येथून निवडणूक लढवण्यासाठी दुसरा उमेदवारी अर्जही दाखल केला होता, तो फेटाळण्यात आला होता. त्यांच्या मीडिया टीमने ही माहिती दिली.
इम्रान खान यांचा लष्करानं निवडणुकीपासून दूर ठेवल्याचा आरोप
इम्रान खान पाकिस्तानात खूप लोकप्रिय आहेत. लष्कराकडून आपल्याला लक्ष्य केले जात आहे, जे आपल्याला निवडणुकीपासून दूर ठेवू इच्छित असल्याचा आरोप केला होता. लष्कराने हा आरोप फेटाळून लावला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने 22 डिसेंबर रोजी देशाची गोपनीय माहिती लीक केल्याच्या प्रकरणात इम्रान खान यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, त्याच्या एक दिवस आधी (21 डिसेंबर) उच्च न्यायालयाने त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या अपात्रतेला स्थगिती देण्यास नकार दिला होता.
इतर महत्वाच्या बातम्या