World bank : जागतिक बँकेने (World bank) पाकिस्तानची (pakistan) स्थिती दाखवून जगासमोर लाजवले आहे. जागतिक बँकेने स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल अपयशी ठरले आहे. इथे गरिबांसाठी काहीच नाही. श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी सर्व धोरणे आखली जात आहेत. पाकिस्तानमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. 


डॉन वृत्तपत्राने जागतिक बँकेचे कंट्री डायरेक्टर नाजी बेनहासीनच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.  पाकिस्तानला अशी धोरणे बदलण्याची गरज आहे, की ज्याचा देशाच्या विकासावर परिणाम झाला आहे.  पाकिस्तानच्या धोरणाचा फायदा काही लोकांनाच झाला असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.


धोरणात सुधारणा हवी


हवामान बदलाचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. सध्या पाकिस्तानने त्यांची कृषी क्षेत्रातील आणि ऊर्जा क्षेत्रातील धोरणे सुधारली पाहिजेत असं मत बेनहासीन यांनी व्यक्त केलं आहे. शेती, अनुदान आणि इतर अनेक उणिवा दूर करण्याची गरज आहे. जेणेकरून देशातील छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल असं बेनहासीन म्हणाले . तसेच, अधिकाधिक लोकांना शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. पाकिस्तानच्या खराब आर्थिक मॉडेलमुळं तो आपल्या सहकारी देशांच्या तुलनेत खूपच मागे पडला असल्याचं मत बेनहासीन यांनी व्यक्त केलं आहे.


पाकिस्तानला काय करण्याची गरज?


सत्ता आणि प्रभाव असलेले लोक सध्याच्या संकटामुळं निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेतील आणि आवश्यक ते करतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पाकिस्तानच्या उज्ज्वल, समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. पाकिस्तानमधील करसवलती तातडीने कमी कराव्यात, अशी सूचना देखील बेनहासीन यांनी केली आहे. तसेच, श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लादून महसूल मिळायला हवा. पाकिस्तानमधील व्यावसायिक वातावरण सुधारण्याची गरज आहे. विशेषत: लघु उद्योगांसाठी चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. जेणेकरून पाकिस्तानमध्ये रोजगाराच्या संधी वाढू शकतील असं बेनहासीन म्हणाले.


पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात महागाई


आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान  देश अनेक काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस देशाची परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. महागाईने (Inflation) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशाचा महागाई दर 40 टक्क्यांच्या वर कायम आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमधील बातमीनुसार, पाकिस्तानमध्ये गॅसच्या वाढत्या किमतींमुळे देशात महागाईत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, या वाढत्या महागाईनं सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या वर्षभरात देशातील गॅसच्या किमती 1,100 रुपयांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये गॅसशिवाय खाद्यपदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. देशात पिठाच्या किंमतीत 88.2 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. याशिवाय बासमती तांदूळ 76.6 टक्के, तांदूळ 62.3 टक्के, चहाची पाने 53 टक्के, लाल तिखट 81.70 टक्के, गूळ 50.8 टक्के आणि बटाटे 47.9 टक्के महागले आहेत. गेल्या वर्षभरात देशात कांद्याचे दर 36.2 टक्के, टोमॅटो 18.1 टक्के, मोहरीचे 4 टक्के आणि वनस्पती तेलाचे भाव 2.90 टक्क्यांनी वाढ झालीआहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Hafiz Sayeed : दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा; भारताची पाकिस्तानकडे मागणी