लंडन : काश्मीर सांभाळण्याची पाकिस्तानची कुवत नाही. काश्मीरची मागणी करण्याऐवजी पाकिस्तानमधील परिस्थितीकडे लक्ष दिले जावे, असं खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने केले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत आफ्रिदी बोलत होता.


"काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी संवेदनशील आहे. काश्मीरचा आपल्या देशात समावेश व्हावा अशी इच्छा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील नागरिक आणि राजकर्त्यांची इच्छा आहे. परंतु स्वतःचा देश सांभाळणे पाकला जड जात आहे," असं वक्तव्य करुन शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना घरचा आहेर दिला आहे.

आफ्रिदी पुढे म्हणाला की, देशाची परिस्थिती ठीक नसताना काश्मीरची मागणी करणे योग्य नाही. तसेच काश्मीरचा भारतातही समावेश केला जाऊ नये. त्याऐवजी काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करावे. तसे केल्यास तिथली माणुसकी कायम राहील. जे लोक मरत आहेत ते मरणार नाहीत.