Pakistan Airstrikes In Afghanistan : पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या लष्करी हवाई हल्ल्यात मृतांची संख्या किमान 47 वर पोहोचली आहे. रविवारी पाकिस्तानचे शब्बीर अहमद उस्मानी यांनी सांगितले की, खोस्त प्रांतातील डुरंड रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात 40 नागरिक, प्रामुख्याने महिला आणि मुले मारली गेली. त्याचवेळी या हल्ल्यात 22 जण जखमी झाले आहेत.


महिला आणि लहान मुलेही मारली गेली आहेत
खोस्तमधील मृतांच्या संख्येची पुष्टी इतर दोन अधिकाऱ्यांनी केली, तर एका अफगाण अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, कुनार प्रांतात सहा जण ठार झाले. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजनुसार, हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलेही मारली गेली आहेत. पाकिस्तानी लष्कराने या हल्ल्यांवर भाष्य केले नसले, तरी इस्लामाबादच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी काबूलमधील तालिबान अधिकाऱ्यांना अफगाण भूमीतून पाकिस्तानवर हल्ले करणाऱ्या सशस्त्र लष्करावर "कठोर कारवाई" करण्याचे आवाहन केले.


अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवाद्यांकडून वापर
निवेदनात म्हटलंय की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून दहशतवादी पाकिस्तानमध्ये कारवाया करत आहेत, गेल्या वर्षी तालिबान सत्तेवर आल्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव वाढला आहे. दरम्यान, इस्लामाबादने असा दावा केलाय की, पाकिस्तानचा सशस्त्र गट अफगाण भूमीतून सातत्याने हल्ले करत आहेत. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे अफगाण-तालिबानचे समर्थक असतील की नाही हे सध्या स्पष्ट नाही. मात्र तालिबान पाकिस्तानी सशस्त्र सैनिकांना आश्रय देण्यास नकार देत आहे. दोन्ही देशांदरम्यान 2,700 किमीची (1,680-मैल) सीमा आहे.


'दहशतवाद्यांवर कारवाई करा',पाकिस्तानचा अफगाणिस्तानला सल्ला


दरम्यान, पाकिस्तानने अफगाणिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानने रविवारी सांगितले की, गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमधून सीमेपलीकडून हल्ल्यांमध्ये त्यांच्या सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात आहे. यावरून त्यांनी आता शेजारील देशातील तालिबान शासकांना अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अलीकडील घटनांबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना पाकचे परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, गेल्या काही दिवसांत पाक-अफगाण सीमेवर घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानी सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात आहे.


पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा चौक्यांवर हल्ले


पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांत अफगाणिस्तान सरकारला पाक-अफगाण सीमा क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी वारंवार विनंती केली आहे. कारण दहशतवादी पाकिस्तानमध्ये त्यांच्या कारवाया करण्यासाठी अफगाण भूमीचा वापर करत आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान त्यांच्या सीमेवर प्रभावी समन्वय आणि सुरक्षेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा करत आहेत. दुर्दैवाने टीटीपी (तेहरिक-ए-तालिबान) सह सीमावर्ती भागातील प्रतिबंधित दहशतवादी गटांचे घटक पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा चौक्यांवर हल्ले करत आहेत, असे पाक परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.