Pakistan Airport Is Under Control Of Underworld:  पाकिस्तानच्या (Pakistan) विमानतळावर अंडरवर्ल्डने कब्जा केला आहे. स्वतःच्या माणसांवर इमिग्रेशनचा स्टॅम्प लागू देत नाहीत. NIA च्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  NIA ने अंडरवर्ल्ड टेरर फंडिंग प्रकरणात सलीम फ्रूटच्या पत्नीची चौकशी केली. त्या चौकशीत  सलीम फ्रूटच्या (Saleem Fruit) पत्नीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. 


सलीम फ्रूट यांच्या पत्नीच्या वक्तव्यानुसार पाकिस्तान विमानतळ आणि तेथे काम करणाऱ्या व्यक्ती अंडरवर्ल्डच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे.  अंडरवर्ल्डने जर ठरवले तर कोण पाकिस्तानात येतंय आणि कोण पाकिस्तान सोडून जातंय याची नोंद जगात कुणाला मिळणार नाही. सूत्रांनी सांगितले की, या शक्तीचा वापर करून अंडरवर्ल्ड अनेकांना पाकिस्तानमध्ये बैठकीसाठी बोलावते आणि कोणालाही त्याची माहिती मिळत नाही. त्याची कुठेही नोंद नसते. 


सलीम फ्रूटच्या पत्नीने आपल्या चौकशीत म्हटले आहे की, ती अनेकवेळा पाकिस्तानला गेली आहे. जिथे छोटा शकीलचे लोक विमानतळावर  स्वागत करण्यासाठी येतात आणि त्यांच्या पासपोर्टवर शिक्का न मारता त्यांना विमानतळाबाहेर आणतात. अंडरवर्ल्डला भेटण्यासाठी पाकिस्तानात कोण येते याची नोंद नसल्यामुळे असे घडत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.


सलीम फ्रूट यांच्या पत्नीने आपल्या जबाबात सांगितले की, ती 2013-14 मध्ये तीन वेळा पाकिस्तानला गेली होती. 2013 मध्ये ती आपल्या मुलांसह पाकिस्तानातील कराची येथे गेली होती. तेथे ते छोटा शकिलच्या मुलीच्या लग्नासाठी गेले होते.  त्यावेळी सलीम फ्रुट त्यांच्यासोबत गेला नाही. फ्रुटच्या पत्नीने पुढे सांगितले की, त्यानंतर ती 24 मार्च 2014 रोजी पाकिस्तानला गेली होती. यावेळीही ती आपल्या मुलांसह पाकिस्तानातील कराची येथे गेली होती.  यावेळी ती छोटा शकीलच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी  गेली होती. त्यावेळेही सलीम त्यांच्यासोबत पाकिस्तानात आला नव्हता. 


फ्रूटच्या पत्नीने आपल्या जबाबात म्हटले आहे की, आम्ही पाकिस्तान एअरलाइन्सने पाकिस्तानला गेलो होतो आणि कराची विमानतळावर उतरल्यानंतर छोटा शकीलने पाठवलेले दोन लोक आम्हाला घ्यायला आले.  ज्यांनी आम्हाला आमच्या पासपोर्टवर कोणत्याही प्रकारचा शिक्का न मारता  विमानतळाच्या बाहेर आणले. त्यानंतर पुढील पाच ते सहा  दिवस छोटा शकिलच्या घरी होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्या लोकांनी आम्हाला विमानतळावर सोडले. त्यावेळी देखील आमच्या पासपोर्टवर  कोणताही शिक्का न मारता आम्हाला विमानामध्ये बसवण्यात आले. यूएईची तिकिटे देण्यात आली आणि तिथून भारतात पाठवण्यात आले.


फ्रूटच्या पत्नीने पुढे सांगितले की, 18 सप्टेंबर 2014 रोजी मी, सलीम फ्रूट आणि मुले असे तिघेही बेकायदेशीरपणे पाकिस्तानातील कराचीला गेलो होतो. यावेळी आम्ही छोटा शकिलच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. त्यावेळी आम्ही पाकिस्तान एअरलाइन्सने पाकिस्तानला पोहोचलो होतो आणि छोटा शकिलचे लोक विमानतळावर आमची वाट पाहत होते. शकिलच्या लोकांनी आमच्या पासपोर्टवर स्टॅम्प न मारता विमानतळाबाहेर आणले त्यानंतर आम्ही छोटा शकिलच्या घरी पोहोचलो. सलीम एक दोन दिवस छोटा शकिलच्या घरी राहिला. त्यानंतर आम्ही पुन्हा विमानतळावर आलो. विमानतळावर आल्यानंतर नेहमीप्रमाणे  स्टॅम्प न मारता त्याला रियाधच्या फ्लाइटने रियाधला पाठवण्यात आले. सलीमच्या पत्नीने पुढे सांगितले की आम्ही तिथे पाच सहा दिवस होतो आणि नंतर पुन्हा विमानाने UAE ला आलो आणि स्टँप न लावता UAE च्या फ्लाईटमधून भारतात पोहोचलो.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Dawood Ibrahim: दाऊदसाठी मुंबईतून पोषाख; अनिस इब्राहिमच्या मुलीच्या विवाहसोहळ्यात लावली होती हजेरी