Dawood Ibrahim Salim Fruitwala: दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोठडीत असलेला गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूट (Salim Fruitwala) याने चौकशीत अनेक मोठे खुलासे केले असल्याची माहिती आहे. अनिस इब्राहिमच्या (Anis Ibrahim) मुलीच्या लग्नात दाऊददेखील हजर होता. इतकंच नव्हे तर दाऊदसाठी खास पोषाख मुंबईतून पाकिस्तानमध्ये नेण्यात आला होता.
काही महिन्यांपूर्वी एनआयएने दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी मुंबईत छापे मारले होते. गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूट याला एनआयएने अटक केली होती. एनआयएकडून सलीम फ्रूटची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये अनिस इब्राहिमच्या मुलीच्या लग्नात दाऊद हजर होता. त्याशिवाय या लग्नात वधूसाठीचे दागिने, लेंहगा, आणि दाऊदसाठीचा खास सूट नागपाडातून नेण्यात आला होता.
सलीम फ्रूट पाकिस्तानात कसा गेला?
या विवाह सोहळ्यासाठी सलीम फ्रूटची पत्नी नेपाळ मार्गे पाकिस्तानमधील कराचीत दाखल झाली होती. तिच्याकडे वधूसाठीचे दागिने होते. तर, सलीम फ्रूटवाला हा वधूसाठीटा लेंहगा आणि दाऊदसाठी तयार करण्यात आलेला खास सूट घेऊन उमराहच्या नावाखाली सौदी अरेबियात गेला होता. त्यानंतर तिथून त्याने पाकिस्तान गाठले आणि विवाह सोहळ्यात सहभागी झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाह सोहळ्यात दाऊदचा भाऊ नूरासह कुटुंबातील अनेक सदस्य सहभागी झाले होते. त्याशिवाय, या सोहळ्यात आयएसआयचे अनेक अधिकारीदेखील उपस्थित असल्याची माहिती सलीम फ्रूटवालाने एनआयए चौकशीत दिली.
सलीम लंगडा अनेकदा फोनवरून माप घेऊन दाऊदसाठी सूट शिलाई करत होता. त्यानंतर हे सूट सलीम फ्रूटवालाच्या माध्यमातून दुबई आणि तेथून दाऊदपर्यंत पाठवले जायचे. वर्ष 2018-19 पासून ते कोरोना लॉकडाउनच्या काळात मुंबईतून दाऊससाठी कोणत्याही वस्तू नेण्यात आल्या नाहीत अशी माहितीदेखील चौकशीत समोर आली आहे.
सलीम फ्रूटच्या वकिलांनी काय म्हटले?
सलीम फ्रूटचे वकील अॅड. विकार राजगुरू यांनी एनआयएचा दावा फेटाळून लावला आहे. एनआयए एका बाजूला म्हणते की, सलीम फ्रूट हा खंडणी वसूल करून दाऊदपर्यंत पोहचवत होता आणि आता दुसरीकडे ही कपड्यांची गोष्ट समोर आणली जात आहे. सलीम फ्रूट याने हे आरोप फेटाळले असून आपण दाऊदसाठी कधीही वसूली केली नाही आणि कधीही कपडे पाठवले नसल्याचे फ्रूटने म्हटले आहे.
अॅड. राजगुरू यांनी म्हटले की, सलीम फ्रूटने कधीही वसूली केली नाही. वसूली केली असती तर मुंबई पोलिसांकडे याची माहिती असती. एनआयएकडेदेखील याचे पुरावे नसल्याचे त्यांनी म्हटले.
सलीम फ्रूट कोण आहे?
सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा खास असल्याचे समजले जाते. सलीमचे वडील हे नळ बाजारमध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करायचे. वडिलांचा व्यवसाय सलीमने पुढे चालवला. सलीम हा दुबईला फळे निर्यात करायचा. दुबईमध्ये त्याचा एक आलिशान बंगला देखील आहे. सलीमचा संबंध डी-गँगशी होता असे म्हटले जाते.