कराची : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंदूंच्या सामूहिक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलतान जिल्ह्यातील या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करत हिंदू कुटुंबातील 5 जणांची हत्या केली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे. पीडित हिंदू कुटुंब मुलतान जवळील रहीम यार खान शहरापासून 15 कि.मी. अंतरावर अबू धाबी कॉलनीत राहत होतं. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह आणखी काही शस्त्रे जप्त केली आहेत. या घटनेतील आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.


रहीम यार खान येथील सामाजिक कार्यकर्ते बिरबल दास यांच्या मते, या कुटुंबातील प्रमुख राम चंद 35-36 वर्षांचे होते आणि ते बराच काळापासून टेलरचं दुकान चालवत होते. राम चंद आणि त्यांचे कुटुंब एक अतिशय शांत आणि आनंदी जीवन जगत होते. अशा परिस्थितीत ही घटना सर्वांसाठी धक्कादायक आहे.


हिंदूंवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ


अल्पसंख्याक हिंदू आणि शीख यांच्यावरील अत्याचाराच्या घटना पाकिस्तानमध्ये सतत वाढत आहेत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी कराचीमधील एका हिंदू डॉक्टरचीही अज्ञात लोकांनी निर्घृण हत्या केली होती. लाल चंद बागरी असं या डॉक्टरचे नाव होतं. ते सिंध प्रांतातील टंडो अलिहार येथे प्रॅक्टिस करत होते. पाकिस्तानमध्ये 1947 पासून अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांवर अत्याचार सुरू आहेत. हिंदू-शीख अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचं जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करुन मुस्लीम तरुणांसोबत त्यांचे लग्न लावून देणे येथे सामान्य गोष्ट आहे. हिंदू-शीख या विषयावर बर्‍याच काळापासून आवाज उठवत आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.