नवी दिल्ली : ऑस्कर पुरस्कार विजेता प्रसिद्ध संगितकार आणि गायक ए.आर रेहमान भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी प्रसिद्ध गायिका भारतरत्न एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना श्रद्धांजली देऊन, पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रात कार्यक्रम सादर करणार आहे. एम. एस सुब्बलक्ष्मी संयुक्त राष्ट्रात गाणे सादर करणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका असून, यानंतरचा हा मान ए.आर. रेहमानला मिळणार आहे.

 

संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''संयुक्त राष्ट्रात 'जय हो' गाजणार. ए. आर. रेहमान भारताच्या 70व्या स्वातंत्र्यदिनी एम.एस. सुब्बलक्ष्मींना श्रद्धांजली देऊन हे गाणे सादर करणार आहेत.''

 

अकबरूद्दीन यांच्या ट्विटसोबत दुसरीही एक पोस्ट टाकण्यात आली आहे. या पोस्टमध्ये ए.आर.रेहमानचा सुब्बलक्ष्मी यांच्यासोबतचा फोटो संयुक्त राष्ट्राच्या फोटोसोबत शेअर करण्यात आला आहे. रेहमान 15 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सर्व जगाला संबोधित करण्यात येणाऱ्या, प्रतिष्ठीत हॉलमध्ये हे गाणे सादर करणार आहे.