नवी दिल्ली/इंडोनेशिया : अंमली पदार्थाची तस्करी केल्याच्या आरोपाखाली इंडोनेशियामध्ये एका भारतीयासह 14 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र त्यापैकी चार जणांना काल गोळी झाडू मृत्यूदंड देण्यात आला.

 

गुरदीप सिंह असं या भारतीयाचं नाव असून ते पंजाबचे रहिवासी आहेत. 2004 साली अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपात इंडोनेशियामध्ये गुरदीप यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2005 मध्ये गुरदीप यांना शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत.

 

गुरदीप सिंह यांचा दावा

"2004 मध्ये वर्क व्हिजा घेऊन मी एजंटच्या मदतीने इंडोनेशियाहून न्यूझीलंड जात होतो. पण इंडोनेशियात पोहोचल्यावर एजंटने माझा पासपोर्ट स्वत:कडे ठेवला आणि मला न्यूझीलंडला घेऊन गेला नाही. त्यानंतर माझ्याकडून जबरदस्तीने अंमली पदार्थांची तस्करी करण्याचं काम करवून घेतलं," असा दावा 48 वर्षीय गुरदीप सिंह यांनी केला आहे. त्यांच्यासोबत नायझेरिया, पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि इंडोनेशियाच्या नागरिकांचाही समावेश आहे.

 

कुटुंबाला अधिकृत माहिती नाही : गुरपाल सिंह

"सुरुवातीला इंडोनेशियातील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं की, गुरदीप सिंह यांना मृत्यूदंड दिला. मात्र 20 मिनिटांनी ते सुरक्षित असल्याची माहिती दिली. पुढे काय होणार याची कोणतीही अधिकृत माहिती आमच्या कुटुंबाला मिळालेली नाही, असं गुरदीप यांचा भाचा गुरपालने सांगितलं.

 

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयही गुरदीप यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. "गुरदीप सिंह यांनी आधीच 10 वर्षांची शिक्षा भोगली आहे, त्यामुळे त्यांच्या शिक्षेत बदल व्हावा," अशी विनंती गुरदीप यांच्या पत्नी कुलविंदर कौर यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे. यावर स्वराज म्हणाल्या की, "आम्ही गुरदीप सिंह यांच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न करत आहोत. शिवाय भारतीय दूतावासही या गुरदीप यांच्या मदतीसाठी झटत आहे."

 

पार्थिव भारतात आणावं : गुरदीप सिंह

भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी गुरदीप यांच्या कुटुंबाशी संपर्क करुन दिला. यावेळी "मला रात्री गोळी घातली जाणार असून माझं पार्थिव भारतात आणावं," अशी इच्छाही कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती.

 

मृत्यूदंड तूर्तास टळला, पण...

अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी काल चार जणांनाच मृत्यूदंड देण्यात आला. त्यामुळे गुरदीप सिंह यांना शिक्षा दिली जाणार की माफ होणार, असे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवाय गुरदीपसह दहा जणांना मृत्यूदंड देणार असतील तर कधी, हेदेखील अद्याप जाहीर केलेलं नाही.

 

इंडोनेशियामध्ये आजही मृत्यूदंड

इंडोनेशियात अंमली पदार्थांशी संबंधित काही कायदे जगभरातील कायद्यांपैक्षा कडक आहेत. इथे आजही गोळ्या झाडून मृत्यूदंड दिला जातो. या शिक्षेविरुद्ध मानवाधिकार संघटनांनी आंदोलनेही केली आहेत.