Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे. या नव्या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन (B.1.1.529) असे नाव दिले आहे. ओमिक्रॉन हा धोकादायक व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन होतो . याशिवाय सुरुवातीच्या पुराव्यांवरून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ग्रीक वर्णमालानुसार या विषाणुला ओमिक्रॉन असं नाव दिलेय. याआधीच्या कोरोना व्हेरिएंटला अल्फा, बिटा, गामा, डेल्टा, कप्पा यासारखी नावे दिली आहेत. त्यानुसार, दक्षिण आफ्रिकामध्ये (Corona Virus South Africa Variant) आढळलेल्या या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.  


24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची नोंद जागतिक आरोग्य संघटनेनं केली. त्यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्ये देखील हा नवीन व्हेरिएंट आढळला.  नव्या व्हेरिएंटचा धोका ओळखून बर्‍याच देशांनी आता दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी किंवा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.  दक्षिण आफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे, बोत्सवाना, लेसोथो आणि इस्वाटिनी येथील प्रवासी यूके किंवा आयरिश नागरिक किंवा यूकेचे रहिवासी असल्याशिवाय यूकेमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली बैठक -
दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचं भय वाढत चाललेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची  बैठक बोलवली आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. डेल्टापेक्षाही जास्त भयंकर हा विषाणू मानला जात असल्याने तातडीने उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनं देशांना काय सुचना केल्यात?


नवीन कोरोना व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक प्रमाणात म्युटेट होतोय. या व्हेरिएंटचं म्युटेशन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास कऱणं गरचेचं आहे. त्याच्या म्युटेशनवर लक्ष ठेवावे. तसेच कशापद्धतीने तो आपलं म्युटेशन करतेय ते पाहावे.
GISAID सारख्या सार्वजनिकरीत्या उपलब्ध डेटाबेसवर संपूर्ण जीनोम अनुक्रम आणि संबंधित मेटाडेटा जागतिक आरोग्य संघटनेकडे जमा करावा. 
IHR यंत्रणेद्वारे व्हीओसी संसर्गाशी संबंधित सुरुवातीची अथवा समूह संपर्काची प्रकरणे जागतिक आरोग्य संघटनेला तात्काळ कळवावीत.
जिथं मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे किंवा वर्दळीची ठिकाणं आहेत तिथं सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय, निदान पद्धती,  रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे उपाय यामध्ये सुधार आणणं गरजेचं आहे. सोबतच तिथल्या प्रयोगशाळांचंही मूल्यांकन करणं गरजेचं आहे.


हा व्हेरिएंट किती धोकादायक?
जगभरातील तज्ज्ञ या प्रकाराला मोठा धोका मानत आहेत. तज्ज्ञांच्या मते, B.1.1529 व्हेरिएंटमध्ये इतर व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त वेगाने संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, इंम्पिरिअल कॉलेज लंडनचे विषाणू तज्ज्ञ डॉ. टॉम पीकॉक यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर व्हायरसच्या नवीन प्रकाराविषयी माहिती दिली. ते म्हणाले की जगातील प्रमुख डेल्टा स्ट्रेनसह इतर कोणत्याही प्रकारापेक्षा हा व्हेरिएंट अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे.


कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना किती धोका?
जगभरात विकसित झालेल्या बहुतेक कोविड लसींचा हल्ला फक्त स्पाइक प्रोटीनवर होतो.  स्पाइक प्रोटीनमध्ये 32 उत्परिवर्तन असल्याने, लशीला प्रभावहीन करण्यास हा व्हेरिएंट सक्षम आहे. हाँगकाँगच्या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचा डोस घेतला होता, तरीही त्यांना संसर्ग झाला. हा नवा व्हेरिएंट लशीचा प्रभाव संपुष्टात आणण्यास सक्षम असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. 


कोरोना विषाणूचा नवीन प्रकार हवेतून पसरतो का?
हाँगकाँगमध्ये सापडलेल्या नवीन प्रकारातील दोन्ही रुग्णांना फायझरची कोरोना लस घेतली होती. हे रुग्ण आफ्रिकेतून परतले  होते. त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या नमुन्यांच्या तपासणीत विषाणूचे प्रमाण खूप जास्त आढळून आले. त्यामुळेच नवीन प्रकार हवेतून पसरत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आज आपल्या धोक्याचा विचार करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती.


नवीन व्हेरिएंटबाबत जगात काय चर्चा सुरू?
B.1.1.529 प्रकाराबाबत संपूर्ण जग सावध झाले आहे. आफ्रिकन देशांची उड्डाणे थांबवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इस्रायलने सात आफ्रिकन देशांच्या प्रवासावर निर्बंध लादले आहेत. इस्रायल सरकारने दक्षिण आफ्रिका, लेसेथो, बोत्सवाना, झिम्बाब्वे, मोझांबिक, नामिबिया आणि इस्वाटिनी या देशांचा 'रेड लिस्ट'मध्ये समावेश केला आहे. त्याच वेळी, ब्रिटनने सहा आफ्रिकन देशांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. सरकारने या देशांची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. त्याचबरोबर सिंगापूरनेही आफ्रिकन देशांमध्ये जाणारी विमान सेवा स्थगित केली आहेत.