Stampede At Church Event in Nigeria: नायजेरियात एक भीषण दुर्घटना घडली आहे. दक्षिण-पूर्व नायजेरियन शहर पोर्ट हार्कोर्ट येथे शनिवारी एका चर्चच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन किमान 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहे. सीएनएनने पोलिस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. शनिवारी येथील चर्चमध्ये अन्न वाटप आणि  भेटवस्तू देणगी सुरू होती. ज्यासाठी शेकडो लोक येथे पोहोचले होते. यावेळी काही लोकांनी आत जाण्यासाठी चर्चचे गेट तोडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. सरकारी आकडेवारीनुसार, अशा घटना नायजेरियामध्ये सामान्य आहेत, जेथे 80 मिलियनहून अधिक लोक गरिबीत राहतात.


सीएनएनच्या वृत्तानुसार, शनिवारी पहाटे शेकडो लोक जेवण घेण्यासाठी चर्चमध्ये पोहोचले. यावेळी लोकांच्या जमावाने चर्चचे गेट तोडले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. नायजेरियाच्या सिव्हिल डिफेन्स कॉर्प्सचे प्रादेशिक प्रवक्ते ओलुफेमी अयोडेल यांच्या म्हणण्यानुसार, 'शॉप फॉर फ्री' कार्यक्रम किंग्ज असेंब्ली चर्चने आयोजित केला होता. ते म्हणाले की, "वस्तूंच्या वितरणादरम्यान, गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली." पोलिस प्रवक्त्या ग्रेस वोयेन्गीकुरो इरिंगे-कोको यांचा हवाला देत वृत्तसंस्थेने सांगितले की, चर्चचे गेट बंद असतानाही जमावाने जबरदस्तीने आत प्रवेश केला, ज्यामुळे ही घटना घडली.


कार्यक्रम सकाळी 9 वाजता सुरू होणार होता, मात्र लोक पहाटे 5 वाजताच आले


इरिंज-कोको म्हणाले की, धर्मादाय कार्यक्रम सकाळी 9 वाजता सुरू होणार होता, परंतु डझनभर लोक त्यांची जागा सुरक्षित करण्यासाठी पहाटे 5 वाजताच येथे पोहोचले. यानंतर त्यांनी बंद गेट तोडले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात लाभार्थ्यांसाठी बनवलेले कपडे आणि बूट दिसत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या