Russia Ukraine War: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनने तीन महिन्यांसाठी मार्शल लॉ वाढवला आहे. युक्रेनने 23 ऑगस्टपर्यंत मार्शल लॉ वाढवला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की 24 फेब्रुवारी रोजी मार्शल लॉच्या पहिल्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. रशियाने पूर्व डोनबास प्रदेशावर हल्ले तीव्र केल्याने युक्रेनच्या संसदेने रविवारी मार्शल लॉच्या तिसऱ्या विस्तारासाठी पूर्ण बहुमताने मतदान केले.
रशियाने डोनबासमध्ये तीव्र केले हल्ले
पोलंडचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनच्या दौऱ्यावर आल्याने रशियाने रविवारी पूर्व युक्रेनमधील डोनबासमध्ये हल्ले तीव्र केले. त्याच वेळी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, या युद्धाचा परिणाम ठरवेल की त्यांच्या देशाचे भविष्य पश्चिमेकडे आहे की ते मॉस्कोच्या अधीन आहे.
रशियाने डोनबासवर क्षेपणास्त्रे डागली
मारिया पोल येथील संघर्षाचे केंद्र बनलेल्या स्टील केंद्राचा ताबा घेतल्यानंतर रशियाने या महत्त्वाच्या शहरावर आपला दावा केला आहे. मारिया पोलनंतर, रशियन सैन्याने युक्रेनच्या डोनबासच्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रदेशावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. ज्याचा उद्देश रशिया-समर्थित फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रदेशाचा विस्तार करण्याचा आहे.
डोनबासमध्ये कठीण आहे परिस्थिती
झेलेन्स्की यांनी शनिवारी रात्री जारी केलेल्या व्हिडीओ संदेशात डोनबासमधील परिस्थिती अत्यंत कठीण असल्याचे म्हटले आहे. झेलेन्स्की म्हणाले की, युद्धाच्या 87 व्या दिवशी युक्रेनियन सैन्याने अजूनही रशियन सैन्याशी खंबीरपणे लढा दिला आहे. युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले, "आम्ही त्या दिवसासाठी लढत आहोत, जो विजय दिवस असेल."
दरम्यान, या युद्धात युक्रेनच्या पाठीशी पाश्चात्य देश उभे आहेत. अशातच पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा अचानक युक्रेनमध्ये दाखल झाले असून ते रविवारी युक्रेनच्या संसदेला संबोधित करणार आहेत. आंद्रेज डुडा यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून लाखो युक्रेनियन निर्वासित पोलंडमध्ये गेले आहेत. युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याच्या युक्रेनच्या इच्छेचा पोलंड हा मोठा समर्थक आहे.