Melting Glaciers : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) व्हेरियंटमुळे जगभरात महामारी पसरली आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचा जीव गेला, अनेक संसार उद्धवस्त झाले, अनेकजण अनाथ झाले... कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही, अशातच वैज्ञानिकांनी आणखी एका महामारीचा इशारा दिला आहे. हिमनदी वितळल्यामुळे (Melting Glaciers)जगात पुन्हा एका नव्या महामारीचा सामना करावा लागू शकतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. हिमनदीच्या खाली अनेक प्राचीन बॅक्टेरिया आणि विषाणू आहेत, जे बाहेर आल्यानंतर जगभरात मोठी महामारी येऊ शकते. हिमनदीच्या खाली असलेल्या विषाणूमुळे सर्वात आधी जलचर प्राणी संक्रमीत होतील. त्यानंतर अन्य जीव आणि माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार होऊ शकतो.
जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि हवामान बदलामुळे हिमनद्या वितळत आहेत. या हिमनदीच्या खाली हजारो वर्षांपासून बॅक्टेरिया आणि विषाणू दडलेले आहेत. हे विषाणू तेथेच प्रजनन करत पिढ्या वाढवत आहेत. अभ्यासात एक नवा खुलासा झालाय की, आर्क्टिक महासागराच्या हिमनदीमध्ये (Glacial Lakes) धोकादायक महामारी पसरवू शकणारे बॅक्टेरिया आणि विषाणूच्या प्रजननाचे केंद्र आहे. येथून निघणाऱ्या विषाणूमुळे इबोला आणि इन्फ्लूएंझा यापेक्षा भयानक महामारी पसरेल.
आर्क्टिक महासागराच्या उत्तरेला असणाऱ्या हेजन लेकवर (Lake Hazen) शास्त्रज्ञांनी नुकताच अभ्यास केला. तेथील माती, गाळ आणि सेडिमेंट्सचा शास्त्रज्ञांनी तपास केला. डीएनए आणि आरएनए मिळवत त्याचा क्रम लावला. जेणेकरुन विषाणू आणि बॅक्टेरियाची माहिती मिळेल. कॉम्प्युटर अल्गोरिदमच्या मदतीनं हे विषाणू कोणत्या जनावरांचे आहेत? कोणत्या झाडाचे आहेत? कोणते बुरशीजन्य आहेत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शास्त्रज्ञांना धक्कादायक माहिती मिळाली. त्यानुसार, लीकमधील विषाणूचा धोका जास्त आहे. हे विषाणू जलचर प्राण्याच्या माध्यमातून मानवामध्ये संक्रमण वाढवू शकतात.
प्रासिडिंग्स ऑफ दी रॉयल सोसायटी ब यामध्ये छापलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, हिमनदीच्या वितळल्यानंतर या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. तापमान वाढ आणि हमामान बदलामुळे हा धोका निर्माण झाला आहे. जलवायु परिवर्तनामुळे वेगवेगळ्या जीव-जंतूमध्ये व्हायरल वेक्टर बदलत आहेत. त्यामुळेच आर्क्टिकच्या अनेक भागात नव्या महामारीचं केंद्र तयार होऊ शकतं. वैज्ञानिकांनी विषाणू आणि विषाणूचा जन्म आणि त्याचा विकास याबाबत अभ्यास केला. त्यावेळी अभ्यासातून महामारी पसरण्याचा धोका वाढू शकतो, असे समोर आले.
विषाणूमुळे अनेक वेगवेगळ्या विषाणूची निर्मिती होऊ शकते, हे विषाणूचा इतिहास पाहिल्यास समोर येते. म्हणजे, जनावर, जलचर प्राणी, झाडं-झुडपं अथवा मनुष्य..यांच्यामध्ये विषाणू पसरु शकतो. अथवा एकाकडून दुसऱ्याकडे (ज्या पद्धतीनं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कोरोना पसरत आहे) विषाणू संक्रमित होतो. जागतिक तापमानात ज्या पद्धतीनं वाढ होत आहे, ते पाहता अतिशय वेगानं हिमनद्या वितळत आहेत. त्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू पसरण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जगभरात महामारी पुन्हा येण्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.
जलवायू परिवर्तनामुळे आर्क्टिकचं मायक्रोबायोस्फियरमध्ये (सूक्ष्मजैविक क्षेत्र) बदलण्याची शक्यता आहे. हिमनदी वितळल्यानंतर विषाणू आणि बॅक्टेरिया बाहेर येतील आणि आपल्यासाठी नवीन होस्ट (होस्ट म्हणजे ज्या जीवांवर ते जगू शकतात) शोधतील. जेणेकरुन आपल्या पिढ्या वाढवता येतील. जसे सध्या कोरोना विषाणू मानवी शरीरात करत आहे. आपल्या पिढ्या वाढवण्यासाठी कोरोना नवनवीन व्हेरियंटच्या रूपात बाहेर येत आहे. त्यामुळे हिमनद्या वितळल्यामुळे अनेक विषाणू आणि बॅक्टेरिया बाहेर येऊ शकतात, त्यामुळे जगभरात पुन्हा महामारी येऊ शकते, अशी भीती शास्त्रज्ञांना आहे.