न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेव्हा 11 वर्षीय विद्यार्थिनीची लाच नाकारतात...
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2019 09:53 PM (IST)
ड्रॅगन्सबाबत संशोधन करण्यासाठी आपल्या टेलिकायनेटिक शक्ती प्रदान कराव्यात अशी अजब मागणी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांना व्हिक्टोरिया नावाच्या विद्यार्थिनीने पत्रातून केली होती.
फोटो सौजन्य : गेट्टी इमेजेस
वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी 11 वर्षीय विद्यार्थिनीने पाठवलेली लाच नाकारली. ड्रॅगनबाबत संशोधन करण्याची बालसुलभ मागणी करत या चिमुरडीने नाममात्र रक्कम पाठवली होती. ड्रॅगन्सबाबत संशोधन करण्यासाठी आपल्या टेलिकायनेटिक शक्ती प्रदान कराव्यात अशी अजब मागणी व्हिक्टोरिया नावाच्या विद्यार्थिनीने पत्रातून केली होती. पत्रासोबत तिने पाच न्यूझीलंड डॉलर (अंदाजे 230 रुपये) पाठवले होते. टेलिकायनेटिक म्हणजेच अंतर्मनाच्या शक्तीने वस्तू हलवण्याची क्षमता. जेसिंडा आर्डर्न यांचं विनम्र उत्तर 'सायकिक आणि ड्रॅगनबाबत तुझ्या सूचना ऐकून आम्हाला कुतूहल वाटलं. मात्र दुर्दैवाने आम्ही याबाबत कोणतंही संशोधन कार्य करत नाही आहोत. त्यामुळे मी तू पाठवलेली लाच परत करत आहे. भविष्यात टेलिकायनेसिस, टेलिपथी आणि ड्रॅगन या विषयावर संशोधन करण्यासाठी तुला शुभेच्छा' अशा आशयाचं उत्तर अधिकृत लेटरहेडवरुन जेसिंडा यांनी हस्ताक्षरात पाठवलं.