न्यूयॉर्क : अलास्कामध्ये दोन फ्लोटप्लेन्सच्या (सी प्लेन) दुर्घटनेत पायलटसह 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक वेळेनुसार काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केचिकन शहराजवळ रॉयल प्रिन्सेस क्रूझवरील प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानांची हवेत धडक झाली.
पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना हवाईसफर केली जात होती, त्यावेळी हा अपघात घडला. द हेविलँड डीएससी-2 बीवर आणि द हेविलँड ऑटर डीसी-3 या विमानांमध्ये हा अपघात झाला. डीएससी-2 बीवर विमानातील पायलटसह चारही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या विमानातील 11 प्रवाशांपैकी 10 जण जखमी झालेत तर एक प्रवासी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. कोस्ट गार्डच्या मदतीने बेपत्ता प्रवाशाचा शोध सुरु आहे.
अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र दुर्घटना घडली त्यावेळी दोन्ही विमानं एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात नव्हती. प्रिन्सेस क्रूजकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर 10 प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सर्व प्रवाशी कॅनडातील वॅनकॉवर या ठिकाणी सात दिवसांच्या सुट्टीवर जात होते. रॉयल प्रिन्सेस क्रूजने शनिवारी वॅनकॉवर येथून प्रवास सुरु केला होता, तर 18 मे रोजी एन्कोरेज येथे पोहोचणार होतं.