New Zealand Earthquake : न्यूझीलंडमध्ये (New Zealand) आज सकाळी जोरदार भूकंप (Earthquake) झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार आज सकाळी 6.11 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप न्यूझीलंडच्या करमॅडेक बेटांवर (Kermadec Islands) झाला. NCS च्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होते. 






तर यूएसजीएसनुसार (USGS), या भूकंपानंतर सुमारे 20 मिनिटांनी, म्हणजे 6:53 वाजता, केरमाडेक बेटावरच पुन्हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत 39 किलोमीटर खोलवर होता.


त्सुनामीचा धोका नाही : NEMA


दरम्यान, भूकंपानंतर न्यूझीलंडला त्सुनामीचा (Tsunami) धोका नाही, असं राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने (National Emergency Management Agency) सांगितलं. सध्याच्या माहितीच्या आधारे, प्रारंभिक मूल्यांकन असं आहे की भूकंपामुळे त्सुनामीमुळे न्यूझीलंडला धोका निर्माण होण्याची शक्यता नाही," असं ट्वीट राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने केलं आहे.






मार्चमध्येही भूकंपाचे धक्के


न्यूझीलंडची करमॅडेक बेटे ही भूकंपप्रवण क्षेत्र आहेत. गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. 16 मार्च रोजी येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.0 एवढी होती. चीन अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नुसार, हा भूकंप न्यूझीलंडमध्ये चीनच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 8.56 वाजता झाला होता.


भूकंप का होतात?
 
पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत राहतात. या प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा त्यांच्यात घर्षण होत असतं. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळल्या किंवा दूर गेल्या तर जमिनीत कंपण जाणवतं, याला भूकंप म्हणतात. भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. ज्याला रिश्टर मॅग्निट्यूड स्केल म्हणतात. रिश्टर मॅग्निट्यूड स्केल 1 ते 9 पर्यंत असते. भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रावरुन म्हणजेच केंद्रबिंदूवरुन मोजली जाते. म्हणजेच त्या केंद्रातून बाहेर पडणारी ऊर्जा याच स्केलवर मोजली जाते. 1 म्हणजे कमी तीव्रतेची ऊर्जा बाहेर येत आहे. 9 म्हणजे कमाल. अतिशय भयानक आणि विनाशकारी हादरे. रिश्टर स्केलवर तीव्रता 7 दर्शवल्यास, त्याच्या सभोवतालच्या 40 किलोमीटरच्या परिसरात जोरदार धक्का जाणवतो.