Diwali Holiday in New York: अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांचे प्रमाण अधिक आहे आणि भारतीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी (Diwali) असल्याने अमेरिकेत दिवाळीसाठी सरकारी सुट्टी घोषित करण्याची तयारी सुरू आहे. न्यूयॉर्कच्या विधानसभेत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास न्यूयॉर्कमध्येही दिवाळीची सुट्टी जाहीर होणार आहे.


अधिवेशन संपण्याआधी प्रस्ताव होऊ शकतो मंजूर


न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेसह इतर संस्कृती जोपासता याव्या यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं न्यूयॉर्क विधानसभेचे अध्यक्ष कार्ल हॅस्टी यांनी बुधवारी (24 मे) एका निवेदनाद्वारे म्हटलं आहे. दिवाळीसोबतच न्यूयॉर्कमध्ये लूनर न्यू ईयरलाही (Lunar New Year) अधिकृत सुट्टी देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मुलांच्या शाळेच्या कॅलेंडरवर या निर्णयाचा काय परिणाम होईल, यावर चर्चा सुरू आहे. विधानसभेचे अधिवेशन संपण्याआधी हे प्रस्ताव मंजूर केले जाऊ शकतात. 


निवडणुकांमध्ये सर्वाधिक भारतीय मतं मिळवण्याचा प्रयत्न


अमेरिकेत भारतीय समुदायाच्या लोकांची संख्या जास्त आहे, त्यात लवकरच न्यूयॉर्कमध्ये निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीत भारतीय समुदायाची सर्वाधिक मतं मिळवण्याच्या प्रयत्नात दिवाळी सुट्टीचा निर्णय घेण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.


लूनर न्यू ईयरची सुट्टी जाहीर करण्याचाही प्रस्ताव


विधानसभेचे अधिवेशन संपण्यापूर्वी दिवाळीची सुट्टी आणि लूनर न्यू ईयरची सुट्टी जाहीर करण्याचा विधानसभेचा प्रयत्न असल्याचं न्यूयॉर्क विधानसभेचे अध्यक्ष कार्ल हॅस्टी यांनी सांगितलं. विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच 8 जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. अधिवेशन संपेपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. 


दिवाळीच्या सुट्टीचा अमेरिकेतील भारतीयांना मिळणार फायदा


न्यूयॉर्क विधानसभेत मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाला दिवाळी दिवस कायदा (Diwali Day Law) असं नाव देण्यात आलं आहे, ज्या अंतर्गत न्यूयॉर्कमधील दिवाळीची सुट्टी ही 12वी सरकारी सुट्टी म्हणून घोषित केली जाईल. सुट्टी मंजूर झाल्यास याचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाला बराच फायदा होईल. अमेरिकेत राहणारे भारतीय आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र परिवारासोबत दिवाळी सण साजरा करण्याचा आनंद घेऊ शकतात.


दिवाळी सुट्टीच्या प्रस्तावाला न्यूयॉर्क विधानसभेत पाठिंबा


न्यूयॉर्क विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार आणि सिनेटर जोए अडाबो यांनी न्यूयॉर्क शहरातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. न्यूयॉर्क स्टेट काऊन्सिलचे सदस्य शेखर कृष्णन आणि काऊन्सिल वुमन लिंडा ली यांनीही दिवाळी सुट्टीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.


पेनसिल्व्हेनिया राज्यात याआधीच दिवाळीची सुट्टी


अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया या राज्यात याआधीच दिवाळी सणासाठी सुट्टीचा (Diwali Celebration in Pennsylvania) कायदा करण्यात आला आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यात 2 लाखांहून अधिक भारतीय लोक राहतात आणि ते दिवाळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानतात आणि दिवाळी सणाला प्राधान्य देतात.


 


हेही वाचा:


Video : धक्कादायक! हिंदू मुलासोबत फिरते म्हणून इंदूरमध्ये तरुणीचा भररस्त्यात छळ; व्हिडीओ पाहून संताप होईल अनावर