Diwali Holiday in Pennsylvania : भारतासह जगभरात दिवाळी (Diwali) हा सण उत्साहात साजरा केला जात. मागील वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली होती. आता दिवाळीची लोकप्रियता पाहून, युनायटेड स्टेट्स ऑफ पेनसिल्व्हेनियाने (Pennsylvania) दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी (Official Holiday) घोषित केली आहे. सिनेटर निकिल सावल यांनी बुधवारी (26 एप्रिल) ट्वीट करुन ही माहिती दिली.


त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "सिनेटने दिवाळीला अधिकृत सुट्टी म्हणून मान्यता देण्यासाठी एकमताने मतदान केलं. प्रकाशाचा हा सण साजरा करणार्‍या सर्व पेनसिल्व्हेनियन लोकांचं अभिनंदन, तुम्ही अतिशय महत्त्वाचे आहात. हे विधेयक सादर करण्यात मला सहभाही होण्याची संधी दिल्याबद्दल ग्रेग रॉथमन यांचे धन्यवाद.






फेब्रुवारीमध्ये मांडलेल्या विधेयकावर एकमताने मतदान


दरम्यान पेनसिल्व्हेनियाचे सिनेटर ग्रेग रॉथमन आणि सिनेटर निकिल सावल यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये पेनसिल्व्हेनियामध्ये दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर करण्यासाठीचं विधेयक मांडलं होतं. ज्यावर एकमताने मतदान झालं आणि दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली.


पेनसिल्व्हेनियामध्ये उत्साहात साजरी केली जाते दिवाळी 


पेनसिल्व्हेनियामध्ये अंदाजे 200,000 दक्षिण आशियाई रहिवासी राहतात, त्यापैकी मोठ्या संख्येने दिवाळी साजरी करतात. हजारो पेनसिल्व्हेनियन लोक दरवर्षी दिवाळी साजरी करतात. मंदिरं, प्रार्थनास्थळं आणि समुदाय केंद्रांमध्ये दिवाळीची पूजा केली जाते.


"आजचा दिवस आनंदाचा आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये दिवाळीला मान्यता देण्याचा कायदा सिनेटने नुकताच 50-0 ने पास केला. दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर केल्याने आपल्या राष्ट्रकुलाची समृद्ध सांस्कृतिक विविधता जपली आहे," असं ग्रेग रॉथमन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.






व्हाईट हाऊसमध्येही दिवाळीचं सेलिब्रेशन


अमेरिकेत दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. व्हाईट हाऊसमध्येही तो साजरा केला जातो. गेल्या वर्षी, जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन नी 24 ऑक्टोबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात दिवाळीचं आयोजन केलं होते. यावेळी अध्यक्षांनी दिवाळीचं प्रतीक म्हणून दीपप्रज्वलनही केलं होतं.


दरम्यान दरवर्षी दिवाळी साजरी करण्याचा दिवस दरवर्षी बदलत असतो, यंदा नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे.