Kartik Purnima 2022 Date Importance : आज 'कार्तिक पौर्णिमा' आहे. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला 'कार्तिक पौर्णिमा' ( Kartik Purnima ) असं म्हणतात. यावर्षी कार्तिक पौर्णिमा सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी  आहे. कार्तिक पौर्णिमेला 'देव दिवाळी' ( Dev Diwali ) असंही म्हटलं जातं. शास्त्रानुसार याच दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता असंही म्हटलं जातं. यामुळे देवांनी उत्साहात दिवाळी साजरी केली होती, त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला देव दिवाळी असंही म्हणतात.


सर्व देव पृथ्वीवर येत दिवाळी साजरी करतात, अशी मान्यता


पौराणिक मान्यतेनुसार, त्रिपुरासुर राक्षसावर भगवान शिवाचा विजय साजरा करण्यासाठी देव दिवाळी साजरी केली जाते. देव दिवाळी दिवशी सर्व देव पृथ्वीवर येतात आणि काशीमध्ये दिवाळी साजरी करतात, अशीही मान्यता आहे म्हणूनच याला 'देव दिवाळी' म्हणतात. या दिवशी दीपदान म्हणजेच दिवे दान करण्याचं विशेष महत्त्व आहे. देव दिवाळीची तारीख, शुभ मुहूर्त, विधी आणि दीपदानाचे महत्त्व जाणून घ्या.


कधी आहे देव दिवाळी 2022?


देव दिवाळी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी कार्तिक पौर्णिमा तिथी 7 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 4:15 पासून सुरू होत असून 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:31 वाजता संपेल. त्यामुळे देव दिवाळी 07 नोव्हेंबर 2022 रोजी साजरी केली जाईल.


देव दिवाळी 2022 मुहूर्त ( Dev diwali 2022 Muhurat )



  • कार्तिक पौर्णिमा सुरुवात : 07 Nov 2022, सायंकाळी 04.15 वाजता

  • कार्तिक पौर्णिमा समाप्ती : 08 Nov 2022, सायंकाळी 04.31 वाजता

  • दिवे दान करण्याचा मुहूर्त ( प्रदोष काळ ) : 07 Nov 2022, सायंकाळी 5.14 ते 7.49 वाजेदरम्यान


दिवे दान करण्याचं महत्त्व काय? ( Deep Daan Importance )


पौराणिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव काशीच्या गंगा घाटावर दिवाळी साजरी करण्यासाठी येतात. यावेळी देव काशी घाटावर स्नान करतात. या दिवशी प्रदोषकाळात दिवे दान केल्याने दु:ख दूर होतं, अशी मान्यता आहे. दिव्याच्या प्रकाशाने तुमच्या आयुष्यातील अंधार, नैराश्य दूर होईल, असंही म्हटलं जातं. तसेच यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभतं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे देव दिवाळीला दिवे दान केल्याने यम, शनी, राहू-केतू यांचे वाईट प्रभाव कमी होतो आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक जीवन सुखी होतं, असाही समज आहे.