World's First New Year Celebration : नव्या वर्षाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. 31 डिसेंबरची मध्यरात्र जसजशी जवळ येत आहे, तसतसा नववर्षाच्या स्वागताचा (New Year Celebration) जल्लोषही वाढत आहे. मध्यरात्र उलटण्याच्या काही सेकंद आधी काउंटडाऊन मोजला जातो. भारतासह अनेक देशांमध्ये नवीन वर्षाची प्रतीक्षा केली जात असताना दुसरीकडे काही देशांमध्ये जल्लोषात 2024 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. पॅसिफीक महासागरातील बेट देश, किरिबाटी, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात या देशांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
मध्य पॅसिफिक महासागरातील आंतरराष्ट्रीय तारीख रेषेच्या पूर्वेकडील किरिबाटी, नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले होते. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 5:30 वाजता येथे तारीख 1 जानेवारी 2024 झाली. याशिवाय आता टोंगा आणि समोआ बेटांवरही नवीन वर्षाचे स्वागत झाले आहे. न्यूझीलंडमध्ये 2024 हे वर्ष आधीच काही तासांपूर्वीच आले आहे. फिजी, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया हे अल्पावधीतच नवीन वर्ष साजरे करणार आहेत.
न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे डोळे दिपावणारी आतषबाजी करण्यात आली.
तर, कांगारुंचा देश ऑस्ट्रेलियातही नवीन वर्षाचे स्वागत दणक्यात करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात भव्य आतषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर पुलावरील आतषबाजीने अनेकांचे भान हरपले.
नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली?
इ.स.पूर्व 45 पूर्वी रोमन साम्राज्यात कॅलेंडर वापरात होते. रोमचा तत्कालीन राजा नुमा पॉम्पिलस याच्या वेळी, रोमन कॅलेंडरमध्ये 10 महिने, वर्षात 310 दिवस आणि आठवड्यात 8 दिवस होते. काही काळानंतर, नुमाने कॅलेंडरमध्ये बदल केले आणि जानेवारी हा कॅलेंडरचा पहिला महिना मानला. 1582 मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू झाल्यानंतर 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्याचा ट्रेंड सुरू झाला.
...म्हणून 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात
रोमन शासक ज्युलियस सीझर हा 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरा करणारा पहिला व्यक्ती होता. नवे कॅलेंडर तयार करण्यासाठी ज्युलियस सीझर यांनी काही खगोलशास्त्रज्ञांची भेट घेतली, त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की पृथ्वी 365 दिवस आणि सहा तासांमध्ये सूर्याला एक फेरी मारतो. त्यामुळे जूलियसने 365 दिवसाचे एक वर्ष असणारे कॅलेंडर तयार केले.
पोप ग्रेगरी यांनी 1582 मध्ये जूलियस सीजरने तयार केलेल्या कॅलेंडरमधील लीप वर्षांची चूक शोधली. त्याकाळचे प्रसिद्ध धर्म गुरू सेंट बीड यांनी सांगितले की, एका वर्षात 365 दिवस, 5 तास आणि 46 सेकंद असतात. त्यानंतर रोमन कॅलेंडरमध्ये काही बदल करण्यात आले. तेव्हापासून नवं वर्ष 1 जानेवारीपासून साजरं केले जाऊ लागलं.