KL Rahul : शस्त्रक्रियेनंतर एके काळी तो तीन-चार आठवडे आपल्या पायावर उभा राहू शकला नसल्याने केएल राहुलला यंदाचा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा विचारही करणे कठीण झाले होते. पण त्याने स्पर्धेत 452 धावा करून शानदार पुनरागमन तर केलेच शिवाय अनेक सामन्यांत तो विरोधी संघांना अडचणीत आणणारा ठरला. शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन आणि यंदाच्या भारतातील एकदिवसीय विश्वचषकातील कामगिरीबाबत राहुल स्टार स्पोर्ट्सच्या 'बिलीव्ह' मालिकेत म्हणाला, 'कमबॅक करण्याचे दडपण होते पण त्यावेळी मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात होतो. यामुळे सगळंच लहान वाटू लागलं होतं. 


शस्त्रक्रियेनंतर पहिले तीन-चार आठवडे मला चालताही आले नाही


केएल राहुल पुढे म्हणाला, 'शस्त्रक्रियेनंतर पहिले तीन-चार आठवडे मला चालताही आले नाही. वॉकरच्या साहाय्याने चालायला सुरुवात केली तेव्हाही मला वाटले की मी विश्वचषक खेळू शकणार नाही. मे महिन्यात शस्त्रक्रिया झाली आणि सर्जन म्हणाले की मी पाच महिने परत येऊ शकणार नाही. विश्वचषक खेळण्यासाठी नक्कीच थेट जाऊ शकत नव्हतो. काही सामन्यांसाठी सराव आवश्यक होता, पण मी त्यावर ताण घेतला नाही. जे होईल ते पाहू, असा विचार केला. 


विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 97 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. नेदरलँड्सविरुद्ध अवघ्या 62 चेंडूत शतक झळकावले. संपूर्ण स्पर्धेत 11 सामन्यात 452 धावा करण्यासोबतच त्याने विकेटच्या मागे 15 झेलही घेतले. भारतीय संघ सलग दहा सामने जिंकून विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला होता जिथे ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्सने पराभूत केले होते.


विश्वचषक 2019 मध्ये भारताचा न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभव झाला होता. त्या स्पर्धेबद्दल राहुल म्हणाला, 'त्या विश्वचषकात आम्ही सर्व आत्मविश्वासाने भरलेले होतो आणि आम्ही जेतेपद जिंकू शकणार नाही असे वाटले नव्हते. पहिल्या फेरीत आम्ही काही शानदार विजयांची नोंद केली. काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी झाली पण आम्ही जिंकण्याचे मार्ग तयार केले.


पराभवानंतर ड्रेसिंग रुममधील सर्वजण भावूक झाले


तो म्हणाला, 'आम्ही हरू शकतो असे वाटले नव्हते कारण आम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यात यशस्वी झालो. आम्ही हरायला तयार नव्हतो, त्यामुळे उपांत्य फेरीतील पराभवाने सर्वांनाच धक्का बसला. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी जेव्हा उपांत्य फेरीत खेळत होते तेव्हा चमत्कार घडेल आणि आपण जिंकू असे वाटत होते. पण असे झाले नाही. पराभवानंतर ड्रेसिंग रुममधील सर्वजण भावूक झाले. मला ते अजूनही आठवतं कारण मी सगळ्यांना असं रडताना आणि निराश कधीच पाहिलं नव्हतं. ती चांगली आठवण नाही पण आमच्यासाठी ती एक धडा होती.


राहुल म्हणाला, 'तुम्ही वर्षभर कितीही चांगले खेळले तरीही आम्ही 10, 15 वर्षांनंतर जेव्हा निवृत्त होतो, तेव्हा आमची कारकीर्द धावांनी किंवा विकेटने किंवा द्विपक्षीय मालिकेतील विजयाने लक्षात राहणार नाही. विश्वचषकाने आमची आठवण राहील. म्हणूनच आम्हाला आणखी चांगला खेळ करायचा होता.


इतर महत्वाच्या बातम्या