H-1B व्हिसाचा नूतनीकरण अर्ज फेटाळल्यास थेट मायदेशी
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2018 08:49 AM (IST)
अमेरिकन प्रशासनाने जारी केलेल्या व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ/नूतनीकरण किंवा 'चेंज ऑफ स्टेटस'साठी केलेला अर्ज फेटाळला गेला, तर त्या व्यक्तीवर डिपोर्टेशनची (देशातून हद्दपार करणे) कारवाई केली जाऊ शकते.
न्यूयॉर्क : अमेरिकेतील नोकरदार भारतीयांना ट्रम्प प्रशासन मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. एच 1बी (H-1B) व्हिसाची मुदत संपल्यावर नूतनीकरण न झाल्यास, व्हिसाधारकाला थेट मायदेशी पाठवण्याची तरतूद असलेलं धोरण लागू झालं आहे. अमेरिकन प्रशासनाने जारी केलेल्या व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ/नूतनीकरण किंवा 'चेंज ऑफ स्टेटस'साठी केलेला अर्ज फेटाळला गेला, तर त्या व्यक्तीवर डिपोर्टेशनची (देशातून हद्दपार करणे) कारवाई केली जाऊ शकते. व्हिसा नसल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी गमवावी लागेल. भरीस भर म्हणजे त्याचं अमेरिकेतील वास्तव्यही बेकायदेशीर असेल. अशा परिस्थितीत इमिग्रेशन न्यायाधीशांच्या निर्णयापर्यंत त्यांना काही महिने अमेरिकेत ताटकळत राहावं लागू शकतं. एनटीए (नोटीस टू अपिअर) बजावल्यानंतर कोर्टापुढे हजेरी न लावल्यास अमेरिकेत पुनर्प्रवेशासाठी पाच वर्षांची बंदी लागू केली जाऊ शकते. हे धोरण 28 जूनपासून लागू झालं असून त्याबाबतची सूचना गेल्याच आठवड्यात अमेरिकन सरकारच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आली आहे.