लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांना लाहोर विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली आहे. इथून त्यांना हेलीकॉप्टरने इस्लामाबादला नेलं जाईल आणि तिथून रावळपिंडी जेलमध्ये पाठवलं जाणार आहे.
नवाज शरीफ लंडनहून अबुधाबीमार्गे लाहोरला पोहोचले. पाकिस्तानमधील एका कोर्टाने नवाज शरीफ यांना दहा वर्षांचा, तर मरियम शरीफला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये याच महिन्यात 25 तारखेला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मरियम लाहोरमधून निवडणूक लढत आहे.
विमानतळावर 10 हजारांपेक्षा जास्त पोलीस तैनात
नवाज आणि त्यांच्या मुलीला अटक करण्यासाठी लाहोर विमानतळावर 10 हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नवाज यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग म्हणजेच पीएमएलच्या समर्थकांना रोखण्यासाठी आणि तणावाला हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली. याशिवाय पीएमएलच्या 300 समर्थकांना अटकही करण्यात आली.
कोणत्या प्रकरणात किती शिक्षा?
गेल्या आठवड्यात नवाज शरीफ आणि मुलगी मरियम यांना पाकिस्तानमधील एका कोर्टाने लंडनच्या ऐवनफील्ड प्रकरणात दोषी ठरवलं आणि दोघांनाही अनुक्रमे 10 आणि सात वर्षांची शिक्षा सुनावली. कोर्टाने मरियम यांचे पती कॅप्टन (निवृत्त) सफदर यांनाही एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टाने 100 पानी निर्णयात नवाज यांना एक कोटी डॉलर, तर मुलीला 26 लाख डॉलरचा दंडही ठोठावला.
पनामा गेट प्रकरणी नवाज शरीफ यांच्याविरोधात तीन खटले दाखल आहेत. ज्यापैकी एक लंडनमधील ऐवनफील्ड अपार्टमेंटसंबंधित आहे. याच प्रकरणात दोघांनाही शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने हे अपार्टमेंट जप्त करण्याचे आदेशही दिला आहेत.
नवाज शरीफ यांच्यापुढे आता पर्याय काय?
कोर्टाच्या निर्णयाचा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असं नवाज शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. आमच्यावर अन्याय झाला असून निवडणूक प्रचारात आमचा हाच मुद्दा असेल, असं ते कोर्टाच्या निर्णयावर बोलताना म्हणाले होते. शिवाय न्यायासाठी सर्व कायदेशीर आणि घटनात्मक बाबींचा विचार केला जाईल आणि नवाज शरीफ धाडसाने लढतील, असं त्यांनी सांगितलं होतं.
पनामा पेपर्स काय आहे?
पनामा पेपर्स सध्याचा जगभरात टॉप ट्रेडिंग टॉपिक आहे. पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही. 11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागले. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं. यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.
पनामा पेपर्समध्ये कोणाकोणाची नावं?
जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आलाय. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसंच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या काळ्या पैशाबाबत पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे.
नवाज शरीफ आणि मुलगी मरियमला विमानतळावर उतरताच अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2018 10:22 PM (IST)
पाकिस्तानमधील एका कोर्टाने नवाज शरीफ यांना दहा वर्षांचा, तर मरियम शरीफला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये याच महिन्यात 25 तारखेला सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -