न्यूयॉर्क : 'नासा'ला आपल्या सूर्यमालेप्रमाणेच आणखी एक सूर्यमाला सापडली आहे. 'नासा'नं केप्लर स्पेस टेलिस्कोप आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे हा शोध लावला आहे.


नव्याने शोध लावलेल्या या ग्रहमालिकेत थोडेथोडके नाही, तर आठ ग्रह असल्याची माहिती नासाने दिली आहे. पृथ्वीचा समावेश असलेल्या आपल्या ज्ञात ग्रहमालिकेव्यतिरिक्त शोध लागलेली ही सर्वात मोठी ग्रहमालिका असल्याचं मानलं जात आहे. केप्लर 90 या ताऱ्याभोवती हे ग्रह फिरतात.

ही सूर्यमालिका आपल्या सूर्यमालिकेपेक्षा 2 हजार 545 प्रकाशवर्ष दूर आहे. सध्या तरी त्यापैकी कुठलाही ग्रह जीवसृष्टीसाठी पोषक नसल्याचं भाकित शास्त्रज्ञांनी केलं आहे. बुधाच्या तापमानाप्रमाणेच या सूर्यमालिकेचं सरासरी तापमान 800 अंश फॅरनहीट म्हणजेच 426 सेल्सिअस असल्याचं गणित नासाने मांडलं आहे.

केप्लर 90 आय हा ग्रह पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. मात्र या ग्रहाला त्यांच्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला अवघे 14.4 दिवस लागतात. म्हणजेच पृथ्वीवरील दोन आठवड्यांच्या कालावधीइतकं त्यांचं एक वर्ष आहे.