रियाद : सौदी अरेबियातील महिलांना गाडी चालवण्याची मुभा दिल्यानंतर, राजे मोहम्मद बिन सलमान यांनी आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर सौदी अरेबियामध्ये सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शनावरील बंदी हटवण्यात आली आहे.


सौदी सरकारकडून आता लवकरच सिनेमागृहांसाठी परवाने देण्यास सुरुवात करणार असून, 2018 मधील मार्चमध्ये सौदी अरेबियातील सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होतील.

सौदी अरेबियाचे सांस्कृतिक मंत्री अल अव्वाद यांनी सांगितलं की, “सिनेमागृहांना परवानगी दिल्याने, देशाच्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. तसेच त्यातून देशातील विविधतेचं दर्शन संपूर्ण जगाला होईल. यासाठी एक व्यापक सांस्कृतिक क्षेत्रा निर्माण करुन, त्याद्वारे आम्ही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणार आहोत. तसेच, यातून सौदी अरेबियात मनोरंजनाचे नवीन पर्यायही उपलब्ध होतील.”

सौदी अरेबियात 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला सिनेमागृहांवर बंदी घालण्यात आली. तेथील मुल्ला-मौलवींनी धर्माचे दाखले देत, सिनेमागृहांवर बंदी आणण्यासाठी दबाव टाकला होता.

त्यातच 2017 च्या जानेवारीमध्ये मुख्य मुफ्ती अब्दुल-अजीज-अल-अल-शेख यांनी सिनेमागृह पुन्हा सुरु करण्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. जर देशात सिनेमागृह पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. तर ते समाजाच्या नैतिक मुल्यांना पायदळी तुडवतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

दरम्यान, काही दिवासंपूर्वीच सौदी राजांनी स्थानिक महिलांना ड्रायव्हिंगची मुभा दिली होती. आता त्यानंतर सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील कट्टरतावाद्यांनी या विरोध करत, देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक प्रतिमेला धोका असल्याचं म्हटलं आहे.'

संबंधित बातम्या

सौदीच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांना ड्रायव्हिंगचं स्वातंत्र्य