बीजिंग: अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवानच्या दौऱ्यावरुन चीन आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. नॅन्सी पेलोसी यांचे विमान तैवानच्या हद्दीत आल्यानंतर चीनने आक्रमक भूमिका घेतली असून तैवानचे तैपेई विमानतळ बॉंबने उडवून देण्याची धमकी त्यांनी दिली आहे. नॅन्सी पेलोसी यांचे तैपेईमध्ये आगमन झालं असून पुढचे काही तास जगासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये येणार असल्याने चीनने या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तर दुसरीकडे तैवानमध्ये नॅन्सी पेलोसींचे स्वागत करण्यासाठी तिथल्या सरकारने मोठी तयारी केली आहे. चीनच्या या भूमिकेला आता रशियाचा पाठिंबा मिळाला असून त्यांनीही अमेरिकेवर चांगलीच टीका केली आहे.
गेल्या एका दशकापासून तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेमध्ये मोठा तणाव आहे. तो आता शिगेला पोहोचल्याचं दिसून आलं आहे. सद्य स्थितीला अमेरिकेसमोर चीन आणि रशिया हे मोठे शत्रू आहेत. रशिया आता युक्रेनच्या युद्धामध्ये गुंतला असून हे युद्ध लांबल्यास रशियाची आर्थिक परिस्थिती ढासळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे अमेरिकेसमोर आता चीन एक एकमेव मोठा स्पर्धक राहिला असून तोदेखील कोणत्यातरी युद्धात गुंतला तर त्याचाही विकास मंदावेल अशी काहीसी स्ट्रॅटेजी अमेरिकेची आहे. त्या दृष्टीने तैवान हा अमेरिकेच्या हातात एक कोलितं असून त्यामुळी चीन युद्धात गुंतू शकतो अशाही पद्धतीचे धोरण असल्याचं सांगितलं जातंय.
आशिया खंड युद्धाच्या उंबरठ्यावर?
नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे आशिया खंडावर युद्धाचे ढग जमा झाले असून कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध झालं तर या युद्धात अनेक देश ओढले जातील. चीनला रशियाने पाठिंबा दिला असून त्यांच्या बाजूने इराण या युद्धात उतरण्याची शक्यता असून अमेरिकेच्या बाजूने ऑस्ट्रेलिया, जपान युद्धात उतरतील.
'वन चायना पॉलिसी'चा अमेरिकेने आदर करावा
नॅन्सी पेलोसी यांच्या पूर्व आशियाच्या दौऱ्यावरून चीनने या आधीच एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, चीन आपल्या संरक्षणासाठी तयार आहे. अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्यावर बोलणं बंद करावं. तैवान हा चीनचा एक भाग असून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या वचनाचे पालन करावं. चीनच्या 'वन चायना पॉलिसी'चा अमेरिकेने आदर करावा.