America Attack : कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा (Al-Qaeda) म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा (Ayman al-Zawahiri) खात्मा करण्यात अमेरिकेला यश आलं आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) तालिबानचा गृहमंत्री हक्कानीच्या घरात जवाहिरी लपून होता. मात्र अमेरिकेनं ड्रोनमधून केलेल्या मिसाईल हल्ल्यात हे सेफ हाऊसमध्ये त्याचा अचूक वेध घेतला. त्यातच जवाहिरीचा अंत झाला. 11 वर्षांपूर्वी अमेरिकेनं लादेनचा खात्मा केल्यानंतर जवाहिरीनं अल कायदाची सूत्र हाती घेतली होती. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात जावाहिरी हादेखिल सूत्रधार होता. त्याच्यावर 25 लाख डॉलर्सचं बक्षीसही होतं. त्यामुळे जवाहिरीच्या मृत्यूनंतर 9/11 च्या हल्ल्याचा बदला पूर्ण झाला अशी भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केली.


अमेरिकेनं काबूलमध्ये हेलफायर मिसाईल वापरून धोकादायक दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला ठार मारले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी याबाबत ट्वीट करून सांगितलं की, रविवारी माझ्या आदेशानुसार, काबुलमधील हवाई हल्ल्यात अल-जवाहिरी मारला गेला. आता न्याय मिळाला आहे. अमेरिकेनं रविवारी सकाळी 6.18 वाजता एका गुप्त कारवाईत अल-कायदा जवाहिरीला ठार केलं. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआयएनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा प्रमुख मारला गेला. मात्र, यानंतर तालिबानचा भडका उडाला आणि त्यांनी हे दोहा कराराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. जाणून घेऊया, ज्या क्षेपणास्त्रानं अल-जवाहिरी मारला गेला, ते क्षेपणास्त्र कोणत्याही स्फोटाशिवाय शत्रूचा कसा खात्मा करते. 


क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य


अमेरिकेच्या R9X क्षेपणास्त्रातून चाकूसारखे 6 ब्लेड बाहेर येतात. क्षेपणास्त्राचे ब्लेड इतके घातक असतात की, ते इमारतीचे आणि कारचे छत देखील कापू शकतात. क्षेपणास्त्राचे लक्ष्य इतके अचूक असते की, त्यामुळे इतर लोकांना इजा होण्याची शक्यता कमी असते. 


अमेरिका हे क्षेपणास्त्र कधी आणि का वापरते?


'द वॉल स्ट्रीट' जनरलच्या 2019 च्या अहवालानुसार, अमेरिकन सरकारनं दहशतवादी नेत्यांना मारण्यासाठी त्याची रचना केली होती. इतर नागरिकांना इजा होणार नाही अशा पद्धतीनं हे क्षेपणास्त्र बनवण्यात आलं आहे. त्याची सुधारित आवृत्ती हेलफायर मिसाइल म्हणूनही ओळखली जाते. 


हे क्षेपणास्त्र अमेरिकेनं खास अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक, सीरिया, सोमालिया, येमेन इत्यादी देशांतील दहशतवादी लोकांना मारण्यासाठी बनवलं होतं. हे बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेदरम्यान बांधण्यात आलं होतं. क्षेपणास्त्र टाळण्यासाठी आणि त्याच्या अवाक्याबाहेर जाण्यासाठी अनेक दहशतवाद्यांनी महिला, मुलं आणि नागरिकांना संरक्षण कवच बनवलं किंवा लपवलं. अशा परिस्थितीत या क्षेपणास्त्रानं त्यांच्यावर हल्ला करणं सोपं होणार आहे.