फ्लोट लाईक अ बटरफ्लाय, अँड स्टिंग लाईक बी...


 



हे काव्यात्मक वर्णनय भूतलावरचा 'द ग्रेटेस्ट' बॉक्सर अशी ओळख लाभलेल्या मुहम्मद अली यांचं.

 

एखादं फुलपाखरु जसं एका फुलावरुन दुसऱ्या फुलावर अलगद उडत जावं, तितकी सहजता मुहम्मद अली यांच्या पदलालित्यात होती. पण एखाद्या मधमाशीने अचानक डंख करावा तसा त्यांचा ठोसा प्रतिस्पर्ध्याच्या चेहऱ्यावर आदळायचा.

 

मुहम्मद अली यांच्या रिंगक्राफ्टचं हे वर्णन केवळ बॉक्सिंगचाहत्यांनाच नाही, तर सर्वसामान्य माणसालाही त्यांच्या शैलीची आजही मोहिनी घालणारं आहे. पण म्हणतात ना, नियती खूप क्रूर असते त्याचा अनुभव मुहम्मद अली यांच्या बाबतीतही आला. मूळच्या कॅशियस क्ले आणि मग मुहम्मद अली या नावांना ज्या बॉक्सिंगने जगज्जेता... द ग्रेटेस्ट बनवलं, त्याच बॉक्सिंगनं मुहम्मद अलींना पार्किन्सनची कधीही बरी न होणारी व्याधी दिली. तीही वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी. मुहम्मद अलींचं वय जसं वाढत गेलं, तसतशी या व्याधीने त्यांची गात्रं आणखी थकवत नेली.

 



1996 सालच्या अटलांटा ऑलिम्पिकची ज्योत प्रज्वलित करण्याचा मान द ग्रेटेस्ट अलीना देण्यात आला होता. मुहम्मद अलींच्या जगभरच्या चाहत्यांसाठी खरं तर तो सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. त्यांच्या लाडक्या अलीला क्रीडाविश्वातला सर्वोच्च मान मिळाला होता. पण त्या क्षणांनी अलीच्या अब्जावधी चाहत्यांच्या काळजावर ओरखडाही उमटवला. एका जमान्यात भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना लीलया उताणे पाडणारे ते दोन हात थरथरताना पाहणं भावना अनावर करणारं होतं.

 

मुहम्मद अलींनी पार्किन्सनच्या आजाराशी एकदोन नाही, तर तब्बल 32 वर्षे फाईट केली. या 32 वर्षांत अली अधिकाधिक थकत गेले, पण त्यांनी संघर्ष सोडला नाही. अखेर वाढलेलं वय आणि श्वसनाचा त्रास मुहम्मद अलींच्या विरोधात गेला. त्यांना हे जग सोडून जावं लागलं. पण ते पार्किन्सनशी लढाई हरले असं कोण म्हणेल? कारण तसा इशाराच मुहम्मद अलींनी देऊन ठेवला आहे.

 



"मला हरवल्याचं तुम्हाला स्वप्न जरी पडलं, तरी लागलीच अंथरुणात उठून माझी दिलगिरी व्यक्त करणं शहाणपणाचं ठरेल."

 

मुहम्मद अलींचा 2014 सालचा हा ट्वीटच त्यांचा एका जमान्यातला आत्मविश्वास होता. याच आत्मविश्वासाच्या बळावर तर त्यांनी शून्यातून जग जिंकलं होतं. कॅशियस मार्सेलस क्ले हे मुहम्मद अलींचं मूळ नाव. खरंतर एका साईनबोर्ड पेन्टरच्या घरात त्यांचा जन्म झाला. पण कॅशियसने वयाच्या बाराव्या वर्षी कुंचल्याचे फटकारे नाही, तर बॉक्सिंगचे ठोसे शिकायला सुरुवात केली.

 

पुढच्या सहा वर्षांत अली यांनी अमेरिकन बॉक्सिंगवर आपल्या खेळाचा असा काय ठसा उमटवला की, 1960 साली रोम ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड झाली. त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी लाईट हेवीवेट गटात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच वर्षी अली यांनी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केलं आणि पुढची 21 वर्ष त्यावर राज्य गाजवलं. या 21 वर्षांत मुहम्मद अली यांनी तीनवेळा व्यावसायिक हेवीवेट बॉक्सिंगचं विजेतेपद पटकावलं. या कालावधीतल्या 61 पैकी 57 लढती जिंकण्याचा पराक्रम त्यांनी गाजवला.

 



मुहम्मद अली यांच्या ज्यो फ्रेझियर, जॉर्ज फोरमन आणि सॉनी लिस्टनसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या लढती भलत्याच गाजल्या. अली यांनी व्यावसायिक बॉक्सिंगच्या रिंगमध्ये गाजवलेल्या पराक्रमांनी त्यांना 'द ग्रेटेस्ट' अशी आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. पण सामाजिक जीवनात लढलेल्या लढायांनी त्यांना साऱ्या विश्वात आदर मिळवून दिला. वयाच्या 19 व्या वर्षांपासूनच त्यांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. वयाच्या 22 वर्षी त्यांना आफ्रिकन अमेरिकन इस्लामिक धार्मिक चळवळीत सहभागी करुन घेण्यात आलं. तिथेच कॅशियस क्ले यांना मुहम्मद अली ही नवी ओळख मिळाली. मुहम्मद अलींनी आफ्रिकी अमेरिकी समाजाच्या समान हक्कांसाठी कायमच आवाज उठवला. पुढे त्यांनी अमेरिकेच्या व्हिएतनामविषयीच्या धोरणाविरोधात बोलण्याचं धाडस दाखवलं. त्यांनी व्हिएतनाम युद्धात अमेरिकी लष्करात सामील होण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मुहम्मद अली यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. 1971 साली अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ती बंदी उठवण्याचा आदेश दिला. याच मानवतावादी भूमिकेने पुढच्या काळात मुहम्मद अली यांना वैश्विक मान्यता मिळवून दिली.

 



बॉक्सिंग खेळाचा हा ऑलटाईम हीरो आणि जगभरातल्या वंचित समाजाचा आवाज आयुष्यभर एखाद्या वीरासारखा जगला. ज्या लढाऊ बाण्याने तो बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरला, तितक्याच हिमतीने त्यानं सामाजिक चौकटीही उखडून टाकल्या. मुहम्मद अलींना एकदा कुणीतरी विचारलं होतं की, लोकांनी तुम्हाला कसं स्मरणात ठेवावं असं वाटतं? त्यावर मुहम्मद अलींचं उत्तर होतं...आपल्याकडे अपेक्षेनं पाहणाऱ्या समाजाला कायम बरोबरीने वागवणारा, त्यांच्याकडे कधीही तुच्छतेने न पाहणारा माणूस म्हणून.

 

मुहम्मद अलींना द ग्रेटेस्ट का म्हटलं जातं त्याचं निरसन त्यांच्या याच उत्तरातून होतं.