Monkeypox Name Change: कोरोना पाठोपाठ जगभरात मंकीपॉक्सनंही (Monkeypox) थैमान घातलं होतं. मानवासाठी धोकादायक अशा मंकीपॉक्सला आता मात्र नवं नाव देण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्स आजाराचं नाव बदललं आहे. सोमवारी (28 नोव्हेंबर) रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्सचे नाव बदलून 'एमपॉक्स' (MPOX) असं जाहीर केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, दोन्ही नावं सुमारे एक वर्ष वापरली जातील आणि नंतर मंकीपॉक्स या नावाचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद होईल.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा अनेकदा यासंदर्भात वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत WHO ला माहिती देण्यात आली. यावर चिंता व्यक्त करत अनेक देशांनी डब्ल्यूएचओला या आजाराचं नाव बदलण्यास सांगितलं होतं.
दोन्ही नावं एका वर्षासाठी वापरता येतील
WHO नं पुढे सांगितलं की, सल्लामसलत केल्यानंतर, WHO नं मंकीपॉक्ससाठी एक नवं नाव लागू करण्याचा निर्णय घेतला, जो MPOX आहे. दोन नावं वर्षभर एकत्र वापरली जातील, तर 'मंकीपॉक्स' नंतर वगळण्यात येतील. हे नवं नाव पुरुषांच्या आरोग्य संघटनेनं REZO प्रस्तावित केलं होतं.
आतापर्यंत 80 हजार प्रकरणांची नोंद
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे हजारो रुग्ण आढळून आले आहेत. मंकीपॉक्सची लक्षणं वेगवेगळी असतात. यामध्ये शरीरावर पुरळ, ताप, थंडी वाजून येणं, लिम्फ नोड्स सुजणं, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. डब्ल्यूएचओच्या (WHO) आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात या धोकादायक आजाराची 80,000 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि 55 मृत्यू झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :