
जर्मनीच्या विटेन शहरात एमिलियाचा जन्म झाला. जन्माच्या वेळी तिच्या पायाची लांबी चक्क अर्ध्या अंगठ्याऐवढी होती आणि वजन 227 ग्रॅम होतं. त्यामुळे एमिलिया जगणार नाही, असंच सगळ्यांना वाटत होतं. पण बचावलीच नाही तर सुखरुपही आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्यांना डॉक्टरांनी तिला 'द लिटल फायटर' असं नाव दिलं आहे.
विटेनमधील सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये एमिलियाचा गरोदरपणाच्या 26 व्या आठवड्यातच जन्म झाला. 26वा आठवडा सुरु झाल्यानंतर डॉक्टर आणि आई-वडिलांनी सीझेरियन करुन डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. सीझेरियनद्वारे डिलिव्हरी केली नसती तर एमिलियाचा गर्भाशयातच मृत्यू झाला असता. कारण एमिलियाला आवश्यक पोषणमूल्य मिळत नसल्याने तिची वाढ सामान्य नव्हती. सामान्यत: गरोदरपणाच्या 26 आठवड्याच बाळाचं वजन 595 ग्रॅम असतं. पण एमिलियाचं वजन प्रमाणापेक्षा कमी होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं.
एमिलिया आता सुखरुप आहे. तिच्यामध्ये गंभीर स्वरुपाच्या आजाराची चिन्हं नाहीत. सुरुवातीला एका छोट्या ट्यूबद्वारे तिला भरवलं जात असे. शिवाय वेदना कमी व्हाव्यात यासाठी नर्स तिला कापसाच्या बोळ्याने साखरेचं पाणी पाजत असत.
एमिलिया आता नऊ महिन्यांची असून तिच्या शरीराच्या भागांची सामान्य बाळांप्रमाणे वाढ होत आहे. सध्या तिचं वजन 3 किलोंपेक्षा जास्त आहे.