कराचीकडे जाणारी अवमी एक्स्प्रेस बुधवारी मध्यरात्री दोन वाजता मालगाडीवर धडकली. एका व्यक्तीला उडवल्यामुळे मालगाडी थांबली होती. या मालगाडीला एक्स्प्रेसने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.
ही धडक इतकी जबरदस्त होती की ट्रेनचे काही डबे रुळावरुन घसरले, तर काही बोगी एकमेकांवर चढल्या. रात्रीच्या अंधारात अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करण्यात आले.
अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बकरी ईदमुळे तीन-चार दिवसांच्या सुट्टीवर गेलेली अनेक कुटुंबं अपघातग्रस्त झाल्याची माहिती आहे.
रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर ट्रेनच्या चालकालाच या अपघाताप्रकरणी दोषी ठरवलं आहे. मालगाडीने लाल सिग्नल देऊनही तो मोटरमनने न पाहिल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या अपघाताप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.