न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचं निवासस्थान असलेलं व्हाईट हाऊस आज गोळीबाराच्या थराराने हादरलं. एका तरुणाने गोळीबार करत 'व्हाईट हाऊस'मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडत, त्याला जेरबंद केलं.

 

या थरारानंतर व्हाईट हाऊस तातडीने बंद करुन सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली.



अमेरिकी मीडियानुसार," एक 20 वर्षीय तरुण व्हाईट हाऊसबाहेर मुख्य चेकपोस्टवर पोहोचला आणि त्याने गोळी झाडली. त्यानंतर 'यूएस सिक्रेट सर्व्हिस'च्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, त्यात तो जखमी झाला.

 

गंभीर जखमी झालेल्या आरोपीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.



दरम्यान गोळीबारानंतर बंद करण्यात आलेलं व्हाईट हाऊस पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी बराक ओबामा गोल्फ खेळत होते, तर उपाध्यक्ष जो बायडेन व्हाईट हाऊसमध्येच होते.

 

या गोळीबारात कोणताही जवान जखमी झाला नसल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र गोळीबारामुळे 'व्हाईट हाऊस' परिसरातील पर्यटक भयभीत आहेत.