Malaysia Landslide : मलेशियामध्ये अवैध कॅम्पसाईटवर भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दुर्घटनेतील अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मृतांमध्ये बालकांचाही समावेश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे गुरुवारी ही दुर्घटना घडली आहे. अवैध कॅम्पसाईटवर झालेल्या भूस्खलनात 19 जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली आणखी 12 जण अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांपैकी दोघांचे मृतदेह मिठी मारलेल्या अवस्थेत सापडले असून ते आई आणि मुलीचे मृतदेह असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकारी सुफियन अब्दुल्ला यांनी सांगितले की, क्वालालंपूरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंट्रल सेलंगोरमधील बटांग काली येथे अवैध कॅम्पसाईटवर ही दुर्घटना घडली आहे.


दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू


सेलंगोरचे मुख्यमंत्री अमिरुद्दीन शायरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन पुरुष, सात महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. अजूनही जवळपास 12 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शोधमोहीम सुरू आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्त दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा लोक कॅम्पसाईटवरील तंबूमध्ये झोपले होते. यावेळी भूस्खलन झालं. यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य राबवलं जात आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या बाहेरील सेलांगोर राज्यात भूस्खलन झालं आहे.






शोध आणि बचावकार्य सुरु


सेलंगोर अग्निशमन आणि बचाव विभागाचे संचालक नोराजम खामीस यांनी शुक्रवारी सांगितलं की, पुढील 24 तास शोध आणि बचाव कार्य सुरू राहील. 700 हून अधिक कर्मचारी शोध आणि बचावकार्यासाठी तैनात आहेत. माती आणि चिखलाच्या ढिगाऱ्यांखाली अडकलेल्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनेत वाचलेल्या कॅम्पसाईटवरील लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, कॅम्पसाईटवरील लोक आपल्या तंबूत झोपले होते. स्थानिक वेळेनुसार पहाटे दोन वाजता स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकू आला. यानंतर काहीची झोपतून जागे झाले आणि त्यांचे तंबू सोडून पळून गेले. हुलू सेलंगोर जिल्हा पोलीस प्रमुख सुफियान अब्दुल्ला यांनी सांगितले की,  या कॅम्पसाईटवर 94 जण होते, अशी प्राथमिक माहिती आहे.


आतापर्यंत 61 जणांना वाचवण्यात यश


अग्निशमन विभागाचे संचालक नोराझम खामीस यांनी सांगितले की, कॅम्पसाईटपासून सुमारे 30 मीटर उंचीवरून भूस्खलन झाले. सुमारे एक एकर क्षेत्र यामुळे बाधित झालं आहे. श्वान पथकासह बचाव पथके ढिगाऱ्याखालील वाचलेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक सरकार विकास मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 61 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये तीन सिंगापूरच्या नागरिकांचाही समावेश आहे.


कॅम्पसाइट' म्हणजे काय?


अधिकार्‍यांनी स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, जमीन मालकांकडे 'कॅम्पसाइट' चालवण्याचा परवाना नव्हता. कॅम्पसाइट' म्हणजे अशी जागा आहे जिथे लोक वेळ घालवण्यासाठी तंबू लावून त्यामध्ये राहतात. मलेशियामध्ये अशी कॅम्पसाइटची ठिकाणे स्थानिक लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.


पंतप्रधानांनी केली पाहणी


मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी शुक्रवारी उशिरा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना तसेच सुखरुप सुटका झालेल्या नागरिकांना मदत देण्याची घोषणा केली. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, ही कॅम्पसाइट गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीरपणे चालवली जात आहे आणि त्याच्या मालकाला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.