अमरावती : अमरावतीच्या 21 वर्षीय तरुणीने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. सोनल बाबरवाल या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी)ची पहिली कल्पना चावला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. आयर्लंडमधील कॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ही घोषणा केली.


भारताची पहिली महिला अंतराळवीर डॉ. कल्पना चावला यांच्या स्मरणार्थ ही स्कॉलरशिप प्रदान केली गेली आहे. फेब्रुवारी 2003 मध्ये कोलंबिया अंतराळयानाच्या अपघातात कल्पना चावला यांचा मृत्यू झाला होता. बुद्धिमान भारतीय महिलांमधील तांत्रिक आणि अंतराळ विषयक संशोधन कौशल्य विकसित करणं हे यामागील उद्दिष्ट आहे.

ही शिष्यवृत्ती म्हणजे जागतिक स्तरावरील बाजारपेठांमध्ये भारताचे नेतृत्व कायम राखण्यासाठी असलेली बांधिलकी आहे, असं शिष्यवृत्ती जाहीर करताना युनिव्हर्सिटीने म्हटलं. अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा कायमच महत्त्वाचा भाग राहील, असंही यावेळी युनिव्हर्सिटीने म्हटलं.

विज्ञान, वैद्यकीय किंवा खगोलशास्त्राशी संबंधित क्षेत्रांतील भारतीय पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग करण्याचा कॉर्क इन्स्टिट्युटचा मानस आहे.