न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्याचं आश्वासन दिलं. त्याचाच परिणाम म्हणजे भारतीयांची अमेरिकेतील प्रवेश प्रक्रिया सुलभ होणार आहे.

भारतीय नागरिकांना अमेरिकेने ग्लोबल एन्ट्री प्रोग्राममध्ये स्थान दिलं आहे. भारतीय प्रवाशांना आता लो रिस्क प्रवाशांचा दर्जा मिळणार आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सरना या उपक्रमात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले आहेत.

अमेरिकेतल्या निवडक 53 विमानतळांवर भारतीय नागरिकांना प्री अप्रुव्हलनंतर थेट प्रवेश मिळेल. म्हणजेच कस्टमच्या चौकशीशिवाय त्यांना पुढे जाता येईल. अर्थातच हाताचे ठसे, पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदांची पूर्तता करणं बंधनकारक असणार आहे.

अमेरिकेच्या 'ग्लोबल एन्ट्री' यादीत समाविष्ट होणारा भारत हा 11 वा देश ठरला आहे. भारताशिवाय अर्जेंटिना, कोलंबिया, जर्मनी, मेक्सिको, नेदरलँड, पनामा, सिंगापूर, स्वित्झर्लंड यासारख्या देशांना हा लाभ मिळतो.

भारतीय नागरिक आमचे विश्वासू प्रवासी झाले आहेत, असं कस्टम बॉर्डर प्रोटेक्शनच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिलीच भेट होती. दोन्ही देशांमध्ये व्यापार, दहशतवाद यासारख्या अनेक मुद्द्यांवर करार झाले.