लंडन : ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या 11 वर्षीय अर्णव शर्मानं मेंसा बैद्धिक चाचणी (IQ Test) मध्ये 162 गुण मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'द इंडिपेंडंट' या ब्रिटनमधील वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, अर्णवने बुद्धिमत्ता अंश चाचणीत सर्वाधिक गुण मिळवत अल्बर्ट आइनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंगसारख्या जगप्रसिद्ध वैज्ञानिकांनाही मागं टाकलं आहे.
या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, अर्णवनं 'द इंडिपेंडंट' वृत्तपत्राला सांगितलं की, ''मेंसा टेस्ट अतिशय अवघड असते. या परीक्षेत यश मिळवणं सोपं नसतं. त्यामुळे मलाही या परीक्षेत इतकं मोठं यश मिळेल याची अपेक्षा नव्हती.''
या परीक्षेसाठी आपण कोणतीही तयारी केली नसल्याचं सांगून अर्णवने पुढे म्हणाला की, ''परीक्षेचं माझ्यावर दडपण नव्हतं. शिवाय, परीक्षेसाठी कोणतीही तयारी केली नसल्यानं, मी निराशही नव्हतो. अतिशय उत्साहाच्या वातावरणात मी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यातील प्रश्न सोडवायला मला दीड तास लागला.''

या परीक्षेच्या निकालांची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला अश्चर्याचा धक्का बसल्याचं अर्णवनं सांगितलं. पण इतकं मोठं यश मिळाल्यानं, कुटुंबियांनाही मोठा आनंद झाल्याचं तो यावेळी म्हणाला.
दरम्यान, अर्णवच्या या यशानं त्यानं अल्बर्ट आइनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंगसारख्या जगप्रसिद्ध वैज्ञानिकांना मागं टाकलं आहे. यापूर्वी अल्बर्ट आइनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांना या बुद्धिमत्ता अंश चाचणीत 160 गुण मिळाले होते.
मेंसा IQ टेस्ट क्लब ही संस्था जगभरात नावाजलेली संस्था असून, याची सुरुवात ऑक्सफर्डमध्ये 1946 साली झाली. याची सुरुवात जगप्रसिद्ध वैज्ञानिक आणि वकील लॅसलोट लियोनल वेयर आणि ऑस्ट्रेलयन वकील रोलेंड बेरिल यांनी केली होती. यानंतर ही संस्था जगभरात प्रसिद्ध झाली होती.