बेरुत : लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली आणि विद्ध्वंसक स्फोटानंतर आठवडाभरात सरकार पायउतार झालं आहे. लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी बेरुत स्फोटांमुळे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिला आहे. पंतप्रधान हसन दियाब यांनी सोमवारी (10 ऑगस्ट) संध्याकाळी राष्ट्रीय टेलिव्हिजनवर देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात स्वत: याची घोषणा केली.


पंतप्रधान हसन दियाब यांच्या राजीनाम्याआधी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला होता. मात्र संपूर्ण सरकारनेच राजीनामा देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर पंतप्रधानांनी संध्याकाळी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांनी आपला राजीनामा लेबनॉनचे राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे सोपवला आहे.


दरम्यान, नवी मंत्रिमंडळाची स्थापना होईपर्यंत पदावर कायम राहा, असं राष्ट्रपतींनी पंतप्रधान हसन दियाब यांना सांगितलं आहे.


लेबनॉनच्या बेरुतमध्ये भीषण स्फोट; घरांच्या खिडक्या फुटल्या, फॉल्स सीलिंगही कोसळल्या


सरकार भ्रष्टाचारी आणि अयोग्य असल्याचा आरोप लेबनॉनची जनता करत होती. सलग तीन ते चार दिवसांपासून संतप्त नागरिकांचं आंदोलन सुरु असून अनेक ठिकाणी आंदोलकांची पोलिसांसोबत झटापटही झाली.


अनेक वर्षांपासून बंदरावर असुरक्षित पद्धतीने ठेवलेल्या 2750 टन अमोनियम नायट्रेटचा मागील मंगळवारी स्फोट झाला, ज्यात 200 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक जखमी झाले आहेत.



मृतांची संख्या वाढून 220 झाली आहे. बेरुतचे राज्यपाल मरवान अबूद यांच्या माहितीनुसार अजूनही 110 जण बेपत्ता आहेत. यापैकी बहुतांश परदेशी कर्मचारी आणि ट्रक चालक आहेत.


राजीनाम्यानंतर पंतप्रधान काय म्हणाले?
अनेक अडथळे आणि विरोधानंतर हसन दियाब याच वर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. ते म्हणाले की, माझ्या सरकारने देशाला वाचवण्यासाठी एक रोडमॅप तयार केला होता, परंतु भ्रष्टाचारामुळे हे शक्य झालं नाही. कोणाचंही नाव न घेता हसन दियाब म्हणाले की, "लेबनॉनमध्ये भ्रष्टाचार 'देशापेक्षाही मोठा आहे'. अतिशय मजबूत भिंतीने आपल्याला वेगळं केलं आहे. अशी भिंत जी अशा घटकांच्या चहूबाजूंनी आहे जे स्वत:च्या हितांच्या रक्षणासाठी हरतऱ्हेच्या चुकीच्या आणि वाईट पद्धती अवलंबत आहेत."


बेरुत स्फोटामुळे आर्थिक संकट
या स्फोटानंतर लेबनॉनमध्ये आर्थिक संकटही गहिरं झालं आहे. या स्फोटामुळे बेरुतमध्ये कमीत कमी तीन अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण या स्फोटाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण लेबनॉनच्या अर्थव्यवस्थेला 15 अब्ज डॉलरचं नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


लेबनॉनच्या राजकीय वर्गात असलेला भ्रष्टाचार आणि कुशासन हे या स्फोटाचं कारण समजलं जात आहे. शहरच्या मुख्य भागात स्फोटकं ठेवण्याच्या कारणांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


दरम्यान लेबनॉनचं संकट पाहता संयुक्त राष्ट्राच्या यंत्रणाही मदत करत आहेत. तर फ्रान्सचे राष्ट्रपती इम्युएनल मॅक्रों यांच्या नेतृत्त्वात आंतरराष्ट्रीय समूहाने लेबनॉनला 29.7 कोटी डॉलरची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.