Langya Henipavirus in China : तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोनाशी लढतोय. तरी अद्याप धोका टळलेला नाही. अशातच आणखी एका नव्या व्हायरसनं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोना महामारीचं केंद्र ठरलेल्या चीनमध्ये (China) आणखी एका नव्या व्हायरसची एन्ट्री झाली आहे.
तैवानच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये झुनोटिक लानग्या व्हायरस (Zoonotic Langya Virus) आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अनेकांना या नवीन विषाणूची लागण झाली आहे. अहवालानुसार, आतापर्यंत 35 जण या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. या नव्या व्हायरसला लानग्या हेनिपाव्हायरस असंही म्हणतात.
पूर्वी चीनचा शेडोंग प्रांत (Shandong Province) आणि मध्य चीनचा हेनान प्रांतात (Henan Province) लानग्या हेनिपाव्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, या व्हायरसची लागण झाली ती, नाही हे तपासण्यासाठी न्यूक्लिक अॅसिड चाचणी पद्धतीचा वापर केला जाईल.
लानग्या व्हायरसचा प्राण्यांपासून संसर्ग?
चीनमध्ये नवीन लानग्या व्हायरसचा उद्रेक झाल्याची माहिती मिळत आहे. हा नवा व्हायरस प्राण्यांपासून पसरत आहे, ज्याला लानग्या हेनिपाव्हायरस लेव्ही असंही म्हणतात. हा व्हायरस प्राण्यांच्या संपर्कात आल्यानं माणसांना बाधित करु शकतो. पूर्व चीनचा शेडोंग प्रांत आणि मध्य चीनच्या हेनान प्रांतात या विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. चीन आणि सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (NEJM) मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, या विषाणूनं आतापर्यंत दोन्ही प्रांतांमधील तब्बल 35 जण बाधित झाले आहेत.
नव्या व्हायरसची लक्षणं काय? कितपत घातक?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडच्या काळात पूर्व चीनमधील तापाच्या रूग्णांच्या घशातील स्वॅबमध्ये हेनिपाव्हायरसचा एक नवीन प्रकार आढळून आला आहे. ज्याचा इतिहास प्राण्यांच्या संपर्कात आहे. संशोधनात भाग घेतलेल्या तज्ज्ञांनी सांगितलं की, हा नवा हेनिपाव्हायरस प्राण्यांपासून आला असावा, काही तापाच्या रुग्णांशी संबंधित आहे. जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो, तेव्हा लोकांमध्ये ताप, थकवा, खोकला आणि मळमळ यांसारखी लक्षणं दिसतात. शेडोंग आणि हेनान प्रांतांमध्ये, लानग्या हेनिपाव्हायरस संसर्गाच्या 35 पैकी 26 प्रकरणांमध्ये ताप, चिडचिड, खोकला, मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणं आढळून आली आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचे आकडे काय सांगतात?
तैवानच्या सीडीसीचे (CDC) उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी रविवारी सांगितलं की, संशोधनातून असं दिसून आलं आहे की, या व्हायरसचा संसर्ग माणसांमधून माणसांना होत नाही. मात्र, याबाबत अधिक माहिती येईपर्यंत सावध राहण्याची गरज असल्याचंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या डेटानुसार, लानग्या हेनिपाव्हायरसचा संसर्ग प्राणी आणि मानवांमध्ये होऊ शकतो. आणि दुर्लक्ष केल्यास याची गंभीर लक्षणंही दिसू शकतात. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, याचा मृत्यू दर 40-75 टक्क्यांच्या दरम्यान आहे.