न्यूयॉर्क : मंकीपॉक्सच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन सरकार (US) सिगा टेक्नॉलॉजीज इंक (SIGA.O) या कंपनीकडून जवळपास 200 कोटी रुपये किमतीचे अँटिव्हायरल औषध Tpoxx विकत घेणार आहे. हे औषध इंट्राव्हेनस फॉर्म्युलेशन प्रकारातील असून ते शिरेवाटे देता येऊ शकते. अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मंकीपॉक्सचा उद्रेक पाहता सरकारने हे पाऊल उचललं आहे. 


ज्या रुग्णांना तोंडावाटे गोळी घेण्यास अडचणी येत आहेत अशा रुग्णांसाठी हे औषध फायदेशीर असून हे औषध इंजेक्शनच्या माध्यमातून देता येतं. कंपनीने पुढील वर्षी IV उपचारांसाठी ऑर्डर देण्याची योजना आखली असून गोळी गिळण्यास असमर्थ असलेल्या रूग्णांसाठी हा एक महत्त्वाचा पर्याय असेल. मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये तोंडात आणि घश्यामध्ये पुरळ आणि फोड उठत असल्याने रुग्णांना गोळी गिळण्यास अडचणी येत आहेत. 


जगभरातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सची 27,800 हून अधिक रुग्णांची नोंद करण्याता आली आहे. त्यामुळे या रोगाला गंभीरतेने घेणं आवश्यक ठरत आहे. अमेरिकेमध्ये या रोगाची 7,500 हून अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहेत.


टीपॉक्सच्या तोंडी आणि इंट्राव्हेनस फॉर्म्युलेशन या औषधाला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (U.S. Food and Drug Administration) उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे. परंतु मंकीपॉक्सच्या उपचारासाठी अद्याप त्याला मंजुरी देण्यात आली नाही.


 






अमेरिकेत आणीबाणी जाहीर
अमेरिकेत मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत आरोग्य आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषणेमुळे या मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी फेडरल निधी आणि संसाधनांचा वापर करण्यात मदत होईल. AFP वृत्तसंस्थेनुसार, आरोग्य सचिव जेवियर बेसेरा यांनी सांगितलं आहे की, 'आम्ही मंकीपॉक्स विषाणूचा सामना करण्यासाठी तयार आहोत. आम्ही अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला मंकीपॉक्स गांभीर्याने घेण्यास आणि या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन करतो. यासाठी प्रशासन योग्य ती मदत करेल.'


मंकीपॉक्सची लक्षणं काय? 
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.