America's President Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक देश म्हटलं आहे. डेमोक्रेटिक काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात बायडन यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. व्हाईट हाऊसने जो बायडन यांच्या वक्तव्याबाबत निवेदन जारी केलं आहे. बायडन यांनी डेमोक्रेटिक काँग्रेस पक्षाच्या अभियानात पाकिस्तानाल खडे बोल सुनावले आहेत. 'मला वाटतं की पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे. पाकिस्तानकडे अनेक आण्विक शस्त्र (Nuclear Weapon) आहेत.'


जो बायडन यांच्या भूमिकेवर प्रश्चचिन्ह


आता एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली असली, तरी दुसरीकडे पाकिस्तानला शस्त्रास्त्रं पुरवणाऱ्यांमध्ये अमेरिकेचास मोठा वाटा आहे. सप्टेंबर महिन्यात जो बायडेन यांनी पाकिस्तानला शस्त्र पुरवण्याच्या सुमारे 3500 कोटी रुपयांच्या कराराला बायडन यांनी मंजुरी दिली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार करण्यास नकार दिला होता. ट्रम्प यांचा निर्णय उलवटत एकीकडे अमेरिका पाकिस्तानला मदत करतेय आणि दुसरीकडे पाकिस्तानलाच धोकादायक देश म्हणत आहे. यामुळे अमेरिकेची ही भूमिका दुटप्पी असल्याचं स्पष्ट होतं आहे.






'भारत आणि पाकिस्तानसोबत अमेरिकेचे वेगळे संबंध'


यापूर्वी अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले होतं. व्हाईट हाऊसने निवेदन जारी करत म्हटलं होतं की, अमेरिकेचे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबतचे संबंध वेगवेगळे आहेत. दोन्ही देशांकडे एका दृष्टिकोनातून पाहणं शक्य नाही. दोन्ही देशांसोबत अमेरिकेची वेगळी भागीदारी आहे.


अमेरिकेकडून पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची मदत


अमेरिकेने सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची मदत केली. अमेरिकेने F-16 लढाऊ विमानासाठी मदत म्हणून पाकिस्तानाला सुमारे 3500 कोटींचं पॅकेज मंजूर केलं. यावेळी भारताने अमेरिकेवर टीकाही केली होती.


भारताने अमेरिकेकड मागितलं उत्तर


पाकिस्तानसोबतच्या F16 लढाऊ विमानांच्या करारावर भारताने अमेरिकेवर टीका करत उत्तर मागितलं होते. भारताचे परराष्ट्र मंत्री यांनी त्यावेळी म्हटलं होतं की, 'अमेरिकेने पाकिस्तान लढाऊ विमानांसाठी दिलेलं हे पॅकेज दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आहे की, दहशतवाद वाढवण्यासाठी. लढाऊ विमाने कुठे आणि कोणाच्या विरोधात वापरली जातात हे सर्वांना माहित आहे.', असे प्रश्न परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी उपस्थित केले होते.