वेलिंग्टन : पदावर असताना प्रसुत झालेल्या न्यूझीलंडच्या पहिल्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांचा नुकताच साखरपुडा झाला. बॉयफ्रेण्ड आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर क्लार्क गेफोर्ड यांच्यासोबत जॅकिंडा विवाह करणार आहेत.

ईस्टरच्या सुट्टीवर असताना माहियामध्ये दोघांचा साखरपुडा झाला. जॅकिंडा यांच्या बोटातील रिंग पाहून प्रसारमाध्यमांनी याबाबत आधीच अंदाज लावला होता. त्यानंतर जॅकिंडा यांच्या प्रवक्त्यांनी साखरपुड्याची अधिकृत माहिती दिली.

पदावर असताना प्रसुत होणाऱ्या न्यूझीलंडच्या पहिल्या पंतप्रधान

आर्डर्न यांनी जून 2018 मध्ये न्यूझीलंडमधील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला होता. त्यांची मुलगी नीव्ह आता दहा महिन्यांची आहे.

न्यूझीलंडमध्ये 1893 साली महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. आर्डर्न या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.

2016 साली पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेताना आर्डर्न या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण व्यक्ती ठरल्या होत्या. पंतप्रधानपद काबीज करण्याच्या अवघ्या सहाच दिवस आधी त्यांना आपण गरोदर असल्याचं समजलं होतं.

पदावर असताना प्रसुत होणाऱ्या त्या न्यूझीलंडच्या पहिल्याच, तर जगभरातील दुसऱ्याच पंतप्रधान (किंवा लोकशाही पद्धतीने नियुक्त सर्वोच्च पदावरील व्यक्ती) ठरल्या आहेत. यापूर्वी 1990 मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी पदावर असताना बाळाला जन्म दिला होता.