मुंबई : तुर्कीतील सर्वात मोठं शहर असलेल्या इस्तंबुल आज बॉम्बस्फोटाच्या धमाक्यानं हादरलं. इस्तंबुलमधील तक्सिम चौकात हा स्फोट झाला असून त्यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटाच्या या घटनेनंतर इस्तंबुल पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये स्थानिक वेळेप्रमाणे संध्याकाळी 4.20 वाजता एका मोठ्या धमाक्यासोबत आगीचा लोळ उठताना दिसत आहे. इस्तंबुलमधील तक्सिम चौक हा नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. या ठिकाणी अनेक दुकानं आणि हॉटेल्स आहेत. त्यामुळे स्थानिकांसोबतच पर्यटकांच्या आवडीचं हे ठिकाण आहे. या ठिकाणी आज संध्याकाळी बॉम्ब स्फोट झाला. 


 






स्फोटाच्या घटनेनंतर या सर्व परिसरात पोलिसांनी नाकेबंदी केली. तसेच या परिसरातल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करण्यात आली. या स्फोटामागे जे कोणी आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. या स्फोटानंतर सर्व शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 


दहशतवादी संघटनांचा हात असल्याची शक्यता 


तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान (Recep Tayyip Erdogan) यांनी या स्फोटामागे दहशतवादी संघटनांचा हात असल्याची शक्यता वर्तवली आहे. या स्फोटामागे जे कोणी असतील त्यांना शोधलं जाईल आणि त्यांना शिक्षा दिली जाईल असं ते म्हणाले. या स्फोटानंतर तपास यंत्रणांना आदेश देण्यात आले असून लवकरच हल्लेखोरांना आम्ही पकडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


महिलेने घडवला स्फोट?


ब्लूमबर्गने दिलेल्या एका वृत्तानुसार, इस्तंबुलमध्ये ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी एका महिलेने पार्सल ठेवले आणि लगेच ती त्यापासून दूर पळत सुटली. त्यानंतर हा धमाका झाला. त्यामुळे या महिलेनेच हा स्फोट घडवून आणल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होतंय. त्या दृष्टीने पोलिसांनीही तपास सुरू केला असून ती महिला कोण होती याचा शोध सुरू केला आहे. 


स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या आधी तुर्कीमध्ये 2015 आणि 2017 साली दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटांमागे इस्लामिक स्टेटचा हात असल्याचं नंतर समोर आलं होतं. 


हेही वाचा :