T20 World Cup 2022 Player of the Tournament: जोस बटलरच्या इंग्लंड संघानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. सॅम करनच्या भेदक गोलंदाजीनंतर बेन स्टोक्सच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडनं विश्वचषक पटकावला. अंतिम सामन्यात तीन विकेट घेणाऱ्या सॅम करनला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याशिवाय त्याला मालिकावीर पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. सॅम करन याने विश्वचषकात 11.38 च्या सरासरीनं 13 विकेट्स घेतल्या आहेत. तर फायनलमध्ये सॅम करन याने 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे सॅमला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरण्यात आलेय. क्रीडा विश्वातून सॅम करन याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. विराट कोहलीला मालिकावीर पुरस्कार द्यावा, अशी अनेक क्रीडा चाहत्यांची इच्छा होती. सोशल मीडियावर विराट कोहली ट्रेंडही करत होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंग यानेही विश्वचषकाच्या मालिकावीराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विराट कोहलीनं विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. माझ्यासाठी या विश्वचषकातील मालिकावीर विराट कोहली आहे. तर सॅम करन विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे, असे रिकी पाँटिंग म्हणाला आहे. विराट कोहलीनं यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. भारतीय संघाचं उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आले, पण विराट कोहलीच्या कामगिरीनं सर्वांचीच मनं जिंकली आहे. सोशल मीडियावर विराटच्या कामगिरीचं कौतुक होत आहे.
विराट कोहलीचं विश्वचषकातील प्रदर्शन -
विराट कोहलीनं यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढल्या आहेत. विराट कोहलीनं सहा डावात चार अर्धशतकासह 296 धावांचा पाऊस पाडला आहे.
सॅम करनचा भेदक मारा -
यंदाच्या विश्वचषकात सॅम करन याने भेदक मारा केला. सॅमनं 11.38 च्या सरासरीनं 13 विकेट्स घेतल्या आहेत. फायनलमध्ये सॅमने 4 षटकांमध्ये फक्त 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने विश्वचषकातील एका सामन्यात 5 विकेट्सही घेण्याचा मान मिळवला आहे. टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये सुरु झाला तेव्हापासून पहिल्यांदाच एका गोलंदाजाला मालिकावीर पुरस्कार मिळाला आहे.
टी20 विश्वचषक इतिहासांत मालिकावीर मिळालेले खेळाडू
टी20 विश्वचषक | मालिकावीर |
2007 टी20 विश्वचषक | शाहिद आफ्रिदी |
2009 टी20 विश्वचषक | तिलकरत्ने दिलशान |
2010 टी20 विश्वचषक | केविन पीटरसन |
2012 टी20 विश्वचषक | शेन वॉटसन |
2014 टी20 विश्वचषक | विराट कोहली |
2016 टी20 विश्वचषक | विराट कोहली |
2021 टी20 विश्वचषक | डेव्हिड वॉर्नर |
2022 टी20 विश्वचषक | सॅम करन |