तेल अविव:  कोरोनामुक्त झाल्यानंतर इस्रायलमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आणि शुक्रवारी बॉनफायर या धार्मिक उत्सावाचं आयोजन करण्यात आलं. या उत्सवाच्या दरम्यान हजारोंची गर्दी जमली आणि चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. या चेंगराचेगंरीत आतापर्यंत 30 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत. 


माऊंट मेरॉन या ठिकाणी बॉनफायर उत्सव दरवर्षी भरवण्यात येतो. यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा होतात. या दरम्यान नृत्याचा कार्यक्रम होतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता. त्यामुळे या वर्षीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. हजारो लोक यासाठी उपस्थित राहिले. ही गर्दी आटोक्यात आणता आली नाही आणि त्याचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं. या चेंगराचेंगरीमुळे 30 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


अनेक नागरिक जखमी अवस्थेत आहेत. त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हॉस्पिटलमध्ये हलवलं जात आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं आहे की, दहा हजार नागरिकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची परवानगी असताना प्रत्यक्षात तीस हजार नागरिकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे या छोट्या जागेत प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाली आणि त्याचं रुपांतर या घटनेत झालं. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.  


इस्रायल हा जगातील पहिलाच देश आहे जो कोरोनामुक्त झाला आहे. इस्त्रायलमध्ये सर्वाधिक प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे त्या देशात बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्या देशातील अनेक नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून मास्कचा वापरही बंद केला आहे. 


कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करणे किती धोकादायक ठरू शकतं हेच इस्त्रायलच्या या घटनेवरून स्पष्ट होतंय. 


महत्वाच्या बातम्या :