Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून या संघर्षातील मृतांचा आकडा 1000 पार पोहोचला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 1100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. शनिवारी हमासने इस्रायलच्या विविध शहरांमध्ये 5000 हून अधिक क्षेपणास्रांचा मारा केला. यानंतर अवघ्या दोन दिवसांत या संघर्षाचा भडका उडाला असून यामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात 1100 जणांचा मृत्यू
इस्रायलने रविवारी गाझाच्या पॅलेस्टिनी ठिकाणांवर हल्ला केला. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या हल्ल्यामध्ये 700 इस्रायली मारले गेले आहेत, तर अनेक नागरिकांचं अपहरण करण्यात आलं आहे. हमासने सुमारे 100 हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवलं आहे. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात रक्तरंजित हल्ला मानला जात आहे. या संघर्षात 300 हून अधिक पॅलेस्टिनींचाही मृत्यू झाला आहे.
हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल सैन्यानेही गाझामधील हमासच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे. इस्रायल लष्कराने गाझापट्टीत रॉकेट हल्ले करत हमासला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"हा आमच्यावरील 9/11 हल्ला"
रविवारी, 8 ऑक्टोबरला इस्रायल आणि हमास यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले झाले. हमासने इस्रायलच्या दक्षिणेकडील सडेरोट शहरावर 100 रॉकेट डागले. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत. इस्रायल लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, "हा आमच्यावरील 9/11 हल्ला आहे. हमासला आमचा राज्याचा नायनाट करायचा आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायली आणि पॅलेस्टिनी दोन्ही बाजूंच्या 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे."
हमासकडून युद्ध तीव्र करण्याची घोषणा
हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 2000 हून अधिक इस्रायली नागरिक जखमी झाले आहेत. याशिवाय 100 जणांचे अपहरण करण्यात आलं आहे. दुसरीकडे, इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील 370 लोक ठार झाले असून 2200 हून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायली लष्कराच्या प्रत्युत्तरानंतर हमासने युद्ध तीव्र करण्याची घोषणा केली. हमासने दावा केला आहे की, त्यांनी रविवारी दक्षिण इस्रायली शहर सडेरोटच्या दिशेने 100 रॉकेट डागले. रॉकेट हल्ल्यामुळे काही लोक जखमी झाले. इस्रायल लष्करानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.