IND Vs AUS, World Cup 2023 : तब्बल 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर टीम इंडियाने पुन्हा एकदा वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023) जिंकण्याच्या इराद्याने विजयाचा श्रीगणेशा केला आहे. टीम इंडियाने आपल्या सलामीच्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) चारीमुंड्या चीत केले आहे.  चेन्नईतील चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका खंडीत केली आहे. 


मागील 27 वर्षांत  ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात कधीच पराभूत नव्हता 


सर्वाधिक वर्ल्डकपवर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने (They won their first match of the World Cup in 6 straight editions) 1996 पासून ते आतापर्यंत कधीच वर्ल्डकपची सलामीची मॅच गमावलेली नव्हती. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. त्याच बलाढ्या ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पराभवाचू धूळ चारली आहे.  1996 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत झाला होता. मात्र, त्यानंतर आजवरच्या सलग सहा वर्ल्ड कपमध्ये आपली पहिली मॅच जिंकूनच दमदार सलामी दिली होती. यामध्ये 1999, 2003, 2007, 2011, 2015, 2019 अशा सलग सहा वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्धी संघाला सलामीच्या सामन्यात मात दिली होती. आज हा विक्रम मोडीत निघाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला सलामीच्या सामन्यात मात दिली आहे.  






भारताचा विजयाचा चौकार - 


भारताने विश्वचषकातील पहिला सामना जिंकण्याची ही सलग चौथी वेळ आहे. याआधी 2011, 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात आपल्या सलामीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.


सामन्याचा लेखाजोखा - 


रोहित शर्माच्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी पराभव करून, वन डे विश्वचषकात विजयी सलामी दिली. चेन्नईतल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 200 धावांचंच माफक आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था दोन षटकांत तीन बाद दोन धावा अशी केविलवाणी झाली होती. त्या परिस्थितीत विराट कोहली आणि लोकेश राहुलनं रचलेल्या 165 धावांच्या झुंजार भागिदारीनं भारताला विजय मिळवून दिला. विराटनं 116 चेंडूंत सहा चौकारांसह 85 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं 115 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 97 धावांची खेळी केली. त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 199 धावांत गुंडाळला. भारताकडून रवींद्र जाडेजानं तीन, तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. रवीचंद्रन आश्विन, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या या तिघांनीही प्रत्येकी एक विकेट काढली.