Israel-Palestine Escalation : इस्रायल (Israel) वरील हमासच्या हल्ल्यातील मृतांची संख्या 300 वर पोहोचली आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांची संख्या 300 च्या पुढे गेली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इस्रायलने दिली आहे. या हल्ल्यात सुमारे 1,590 लोक जखमी झाले आहेत. हमासचे अतिरेकी आणि इस्रायली सैनिक यांच्यामध्ये गाझापट्टी संघर्ष सुरुच आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढतच जाणार आहे. इस्त्राइल (Israel) आणि पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवादी संघटना 'हमास' (Hamas) यांच्यातील संघर्ष फार पूर्वीपासून चालत आलेला आहे.


इस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका


इस्रायलमध्ये हमासने जमीन, वायू आणि पाणी अशा तिन्ही मार्गांनी हल्ला केला आहे. इस्रायलीवर गोळीबार करत हमासच्या दहशतवाद्यांनी अनेकांना ओलिस ठेवल्याची माहिती समोर आहे. हमासने ओलिस ठेवलेल्यामध्ये इस्रायली नागरिक आणि सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान, हमासने नेमके किती ओलिस ठेवले आहेत, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. हमासचे दहशतवादी इस्रायलींचे अपहरण करून त्यांना गाझामध्ये आणत आहेत.


हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यात 300 हून अधिक जणांचा मृत्यू


इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांनी इस्रायलींवर गोळीबार केला. इस्रायलमध्ये घुसलेल्या हमासच्या बंदुकधारींनी केलेल्या हल्ल्यात 300 हून अधिक लोक ठार झाले. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल हमासवर हवाई हल्ले केले यामध्ये सुमारे 230 लोक मारले गेले. हमासच्या बंदुकधारींनी इस्रायली शहरांमध्ये घुसखोरी केली. या हल्ल्यात 300 हून अधिक लोक मारले, तर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर देत हवाई हल्ले केले.






इस्रायलचे पंतप्रधान काय म्हणाले?


हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की "हमासने केलेल्या हल्ल्यामुळे हे युद्ध आमच्यावर लादले गेलं आहे. हे दीर्घ आणि कठीण युद्ध लढण्याची आम्ही शपथ घेतली. आम्ही इस्रायलच्या नागरिकांना सुरक्षा बहाल करू आणि आम्ही जिंकू..


हमासच्या हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणांवर टीका


इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांवर टीका होत आहे. इस्त्रायली एजन्सींनी त्यांचे काम योग्य पद्धतीने केलं नाही, असा आरोप केला जात आहे. हमासच्या एवढ्या मोठ्या हल्ल्याची माहिती त्यांना कशी नव्हती, असे प्रश्न इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांना विचारले जात आहेत. इस्रायलमध्ये 5000 रॉकेट डागल्याचा दावा हमासने केला आहे.